12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Heart Attack ची लक्षणं वेळीच ओळखा; कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना गमवावा लागला जीव


नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. श्रीवास्तव यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांच्यावर गेल्या 41 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केलं होतं. आज त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावल्यानं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, मात्र सर्व वैद्यकीय प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्यांना मृत्यूने गाठले.

अलिकडे अगदी कमी वयातही लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. गेल्या काही वर्षात बदलती जीवनशैली, ताण-तणावाचं वाढतं प्रमाण, पुरेशा व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आदी कारणांमुळे हृदय विकार (Heart Disease) असलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला तसेच उपचार घेतल्यास ह्रदय विकार नियंत्रणात ठेवता येतो.

हार्ट अॅटॅक (Heart Attack) अर्थात हृदयविकाराच्या झटक्याला वैद्यकीय परिभाषेत मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असं म्हणतात. हा आजार जुनाट समजला जातो. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही, तेव्हा ही स्थिती निर्माण होते. हृदयाला होणारा रक्त पुरवठा ठप्प झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. हा अडथळा प्रामुख्यानं चरबी, कोलेस्ट्रेरॉल किंवा अन्य पदार्थांमुळे निर्माण होतो. यामुळे हृदयाकडे जाणाऱ्या धमन्यांवर परिणाम होतो. काही वेळा अशा प्रकारचे पदार्थ धमन्यांमध्ये अधिक प्रमाणात साठून राहिले तर रक्त प्रवाहावर विपरीत परिणाम होतो. रक्त प्रवाहावर परिणाम झाल्याने हृदयाचे स्नायू गंभीररित्या दुखावले जाण्याची किंवा त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease) हे हृदयविकाराचा झटका येण्यामागचं प्रमुख कारण असते. कोरोनरी आर्टरी किंवा धमन्या अचानक आकुंचन पावल्यानं हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह थांबू शकतो. हृदय विकाराच्या झटक्यादरम्यान एखादी धमनी फुटू शकते आणि कोलेस्ट्रेरॉलसह अन्य पदार्थ रक्त प्रवाहात पसरू शकतात. तसेच धमनी ज्या ठिकाणी फुटते तेथे रक्ताची गुठळी देखील तयार होऊ शकते. यामुळे धमनीमधील रक्तप्रवाह रोखला जातो. परिणामी ऑक्सिजन आणि अन्य पोषक घटक हृदयापर्यंत पोहचू न शकल्यानं धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

हृदय विकाराचा झटका येण्यापूर्वी त्याची काही लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे लक्षणं दिसताच तातडीनं उपचार करणं गरजेचं असतं. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हृदय विकाराच्या झटक्याची लक्षणं –

छातीत दुखणं आणि अस्वस्थ वाटणं : हृदय विकाराचा झटका आल्यास छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला काही वेळापुरते दुखू लागते. त्यामुळे अस्वस्थता जाणवू लागतं. हे लक्षण काही वेळेपुरतं दिसतं.

अशक्त वाटणं, डोकं हलकं वाटणं : हृदय विकाराचा झटका आल्यास अशक्त वाटू लागतं. डोकं हलकं वाटतं तसेच शरीर थंड पडल्यासारखं वाटू लागतं.

अन्य अवयवांमध्ये वेदना : हृदय विकाराचा झटका आल्यास जबडा, मान आणि पाठीत वेदना जाणवू लागतात आणि अस्वस्थता वाटू लागते. तसेच एक किंवा दोन्ही हात आणि खांदे दुखू लागतात.

श्वास घेण्यास त्रास होणं : हृदय विकाराचा झटका आल्यास छातीत वेदना होऊ लागतात. तसेच छातीत अस्वस्थ वाटू लागतं. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा चक्कर देखील येते.

मळमळ किंवा उलटी होणं : काही रुग्णांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर मळमळ जाणवू लागते. उलटी देखील होते.

हे वाचा – हृदयविकाराचा झटका कोणालाही येतोय

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ही व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात. काही लोकांना तीव्र वेदना जाणवतात तर काही लोकांना कमी प्रमाणात वेदना होतात. तर काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. लक्षणांची तीव्रता जितकी अधिक असते तितका हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अनेक लोकांना अचानक हृदय विकाराचा झटका येतो. मात्र काही रुग्णांमध्ये झटका येण्यापूर्वी काही तास, काही दिवस किंवा काही आठवडे लक्षणं दिसून येतात. हालचाली केल्यानंतर छातीत वारंवार दुखणं आणि शांत बसल्यावर बरं वाटणं हे हृदयविकाराचं प्राथमिक लक्षणं असू शकतं. पुरुषांमध्ये हे लक्षण प्रामुख्याने दिसून येतं. महिलांमध्ये नेहमीच्या लक्षणांव्यतिरिक्त अन्य काही लक्षणं देखील दिसून येतात. त्यात श्वास घेण्यास त्रास होणं, मळमळ किंवा उलटी, पाठ किंवा जबडयात वेदना होणं या समस्यांचा समावेश असतो. तसेच अनेकदा महिलांना छातीत किंवा ओटी पोटाच्यावर दाब जाणवणं, वेदना होणं, चक्कर येणं, डोकंदुखी, मुर्च्छा येणं, पाठीच्या वरच्या बाजूला वेदना होणं आणि थकवा येणं ही लक्षणंही जाणवतात.

हे वाचा – राजू श्रीवास्तवसह या 5 तरुण सेलिब्रिटींचा हार्ट अटॅकने झालाय मृत्यू

हृदय विकार किंवा हृदयविकाराचा झटका येण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असतात. त्यात वय, व्यसनं, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, डायबेटिस, मेटाबॉलिक सिंड्रोम, अनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव आदींचा समावेश असतो. त्यामुळे यापैकी कोणतीही समस्या असेल तर वेळीच वैद्यकीय उपचार घेणं आणि उपाययोजना करणं हितावह ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News