3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

मुलांसमोर वाद घालताय? भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम – News18 लोकमत


मुंबई, 17 सप्टेंबर: जिथं प्रेम असतं तिथं भांडणं, वादविवाद आणि रुसवे-फुगवे असतात, असं म्हणतात. कोणत्याही नातेसंबंधात ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, बऱ्याचवेळा कधीतरी होणाऱ्या वादाचं रूपांतर रोजच्या भांडणं आणि अगदी मारामारीत होतं. याचा नकारात्मक परिणाम मुलांवरही होतो. काही लोक तर मुलांसमोर भांडायला लागतात. आपल्या पालकांना रोज भांडताना पाहून मुलांमध्ये तणाव, एन्झायटी, वर्तनाशी संबंधित किंवा निद्रानाश या सारख्या समस्या दिसू लागतात. पालकांना रोज भांडताना पाहून मुलं दुःखी, अस्वस्थ होतात, तसंच त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होतो.

पालकांना नेहमी एकमेकांशी मोठ्या आवाजात भांडताना पाहून मुलं त्यांच्या बोलण्यास घाबरू लागतात. यामुळे आई-वडिल आणि मुलांमधल्या नात्यावर भविष्यात परिणाम होऊ शकतो. त्यांच्या नात्यात दुरावा (Distance) निर्माण होऊ शकतो. पालकांप्रमाणेच मुलंदेखील प्रत्येक गोष्टीत ओरडायला लागतात आणि वाद घालू लागतात. तुमची मुलं तुमच्यापासून दूर जाऊ नयेत असं वाटत असेल, तर एकमेकांशी वाद घालताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

मुलांसमोर वाद घालताना या गोष्टी टाळा:

– मुलांसमोर वाद घालणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. याचा त्यांच्या विपरित परिणाम होऊ शकतो. तुम्हाला रोज एकमेकांशी भांडताना, एकमेकांवर ओरडताना पाहून मुलंदेखील रागीट, हिंसक होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन एकमेकांशी वाद घालावा. मुलांसमोर या गोष्टी टाळाव्यात.

– तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मताशी सहमत असाल किंवा नसाल, पण ओरडण्याऐवजी कमी आवाजात एकमेकांशी बोलू शकता. आरडाओरड करून कोणतीही समस्या सुटू शकत नाही, तर यामुळे त्या अजूनच क्लिष्ट होतात. यामुळे तुमच्या मुलांच्या मनात भीती निर्माण होते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तुमच्याविषयी चुकीचा विचार आणि समजही तयार होतो.

– मुलांसमोर भांडणं, वादविवाद करताना एकमेकांवर हात उचलू नका. काही वेळा पुरुष खूपच आक्रमक होतात. रागाच्या भरात ते मुलांसमोर त्यांच्या आईवर हात उगारतात. यामुळे मुलं तुमच्याशी बोलणं थांबवू शकतात. जर घरात मुलांसमोर अशा गोष्टी रोज घडत असतील तर त्यांच्या मनात महिलांविषयी नकारात्मक दृष्टीकोन तयार होऊ शकतो. यामुळे ते अन्य महिलांचा सन्मान देखील करणार नाहीत.

– जर तुम्ही एकमेकांच्या मतांविषयी असहमत असाल तर त्याविषयी शांततेनं बसून चर्चा करावी. तुम्ही एकमेकांशी भांडत असाल, परंतु, तुमच्यामध्ये प्रेम आणि आपुलकीदेखील आहे, हे मुलांना जाणवू द्या. परिस्थिती कोणतीही असली तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं मुलांना वाटू द्या.

हेही वाचा: फक्त 3 तासांची झोप तरी सत्तरीत पंतप्रधान मोदी फिट; इथं पाहा त्यांच्या फिटनेसचं रहस्य

– पालक होणं आणि नंतर आपली सर्व कर्तव्यं पार पाडणं हे सोपं नसतं. अशा अनेक गोष्टी असू शकतात, ज्यावर तुम्हा दोघांचं मत आणि विचार भिन्न असतात. तुमच्या मुलांच्या संगोपनाच्या बाबतीत तुमच्या दोघांमध्ये कितीही मतभेद असले तरी मुलांसमोर या गोष्टींवरून वाद घालू नका. आई-वडिलांची भांडणं पाहून मुलं स्वतःबद्दल चुकीचा विचार करू लागतात. यामुळे पालकांमधील सतत भांडणं आणि मतभेदाचं कारण आपण आहोत, असं त्यांना वाटू शकतं. अनेक मुलं आपल्या अस्तित्वाला दोष देऊ लागतात. भावनिक तणाव आणि रागामुळे मुलांमध्ये आक्रमकता येऊ लागते.

– काही पालक असेही असतात, जे भांडणादरम्यान मुलांबद्दल बोलतात, त्यांना पाठिंबा देत त्यांची बाजू घेतात. कधीही मुलांची बाजू घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमची चूक असली तरीही मुलांनी तुमच्या दोघांपैकी एकाची निवड करावी किंवा एखाद्याच्या मताला न्याय द्यावा लागेल, अशी परिस्थिती नात्यात कधीही येणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यावी. यामुळे मुलं मोठी झाल्यावर चुकीच्या गोष्टीचं समर्थन करतील, त्यांचे निर्णयदेखील चुकतील.

– जीवनात नातेसंबंध असतील तर वादविवाद, भांडणं, मतभेद होत राहतील. पण वाद घालून छोटे विषय मोठे करणं टाळा. कोणतंही प्रकरण वाढवण्याऐवजी वाद कसा मिटेल यासाठी प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या मुलांना कळेल की तुम्ही दोघंही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहात, समस्या एकत्रितपणे हाताळत आहात. त्यामुळे त्यांच्यात सुरक्षिततेची (Security) भावना निर्माण होईल. त्याचबरोबर कोणताही वादविवाद, भांडण सकारात्मक पद्धतीनं कसं संपवता येतं, हे देखील त्यांना समजेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News