3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

भरपूर चहा प्या आणि मृत्यूचा धोका कमी करा; वाचा फायदे – News18 लोकमत


मुंबई,  14 सप्टेंबर:  आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता हे आपण डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञांकडून ऐकत असतोच. आरोग्याच्या तक्रारी दूर राहाव्यात यासाठी सकाळी उठल्यावर व्यायाम, योगा, नियमित पळणं यासारख्या गोष्टी आपण करतो. जेणेकरून शरीरातील ऊर्जा ही नियंत्रणात राहते. अतिश्रमाने मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. थकवा घालवण्यासाठी आपण अनेकवेळा चहा, कॉफी वगैरे घेतो. भारतात मोठ्या प्रमाणावर चहा पिणार्‍यांची संख्या आहे. काही जण तर दिवसातून पाच-सहा कप तर, काही जण त्याहूनही अधिक प्रमाणात चहा पितात. असा हा चहा जास्त पिऊ नये असं अनेकवेळा आरोग्यविषयक कार्यक्रमात किंवा डॉक्टर्सकडून सांगितलं जातं; पण एका नव्या संशोधनात असं दिसून आलंय की चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होते. ऐकून धक्का बसला ना? जाणून घेऊयात याबद्दलची माहिती.

अ‍ॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या चहाविषयीच्या संशोधनात असं म्हटलंय की, चहा अजिबात न पिणार्‍या लोकांच्या तुलनेत दिवसाला दोन कप किंवा त्यापेक्षा अधिक चहा पिणार्‍या लोकांमध्ये लवकर मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे. अर्थात, चहा पिणार्‍या माणसांना मृत्युचा धोका कमी होतो. चहातील अ‍ॅटिऑक्सिडंट्ससारखी घटकद्रव्यं ही शरीरास उपयुक्त असतात. यापूर्वी चीन आणि जपानमध्ये केल्या गेलेल्या संशोधनांत असं म्हटलं होतं की, नियमितपणे ग्रीन टी  पिण्याने आरोग्य उत्तम राहतं आणि मृत्युचा धोकाही कमी होतो. पण या पूर्वीच्या संशोधनात ब्लॅक टी अर्थात काळा चहा पिणं कितपत उपयुक्त आहे ही गोष्ट विचारात घेतली नव्हती.

हेही वाचा – Difference Between Pure And Synthetic Milk : दुधातली भेसळ कशी ओळखायची? काही सोप्या टिप्स घ्या जाणून

चहाबद्दलच्या या संशोधनात ब्रिटनच्या बायोबॅंकच्या डेटाचा वापर केला गेला. बायोबॅंकच्या या संशोधनांतर्गत वय वर्ष 40 ते 69 या वयोगटातील जवळपास 5 लाख व्यक्तींच्या आरोग्याचं मागील अनेक वर्षांचे रेकॉर्ड नोंदवलं असल्याचे दिसून आलं. चहा पिण्याचा आणि देशातील मृत्युदराचा परस्पर संबंध काय आणि कसा आहे हेच संशोधकांना जाणून घ्यायचं होतं. ज्या वयोगटाचे रेकॉर्डस उपलब्ध होते त्यामध्ये ब्लॅक टी पिणार्‍यांची संख्या अधिक होती. ज्या 5 लाख लोकांच्याबद्दल सर्वेक्षण घेण्यात आलं होतं, त्यात दिवसभरातील त्यांचं सरासरी चहाचं सेवन किती आहे याची नोंद केली होती. ब्लॅक टी असो किंवा ग्रीन टी पिणाऱ्या व्यक्ती तसंच चहात दूध आणि साखर घालून तो पिणाऱ्या व्यक्ती यांचा या डेटातील व्यक्तींमध्ये समावेश होता. त्याचबरोबर त्यांच्या अनुवंशिक गोष्टींची माहितीही या सर्वेक्षणात अभ्यासण्यात आली होती.

या संशोधनात असं दिसून आलं की, 90 टक्के लोक अगदी दररोज काळा चहा पित असत. त्यासोबतच संशोधकांनी या व्यक्तींचं मागील 11 वर्षांतील चहा पिण्याचं प्रमाण किती आणि कसं होतं याबद्दलचे आकडे दिले आहेत. या संपूर्ण संशोधनाअंती असं दिसून आलंय की, जी माणसं चहा अजिबात पित नाहीत त्यांच्या तुलनेत दोन कप किंवा अधिक चहापान करणाऱ्या व्यक्तींना मृत्युचा धोका 13 टक्क्यांनी कमी होता.

संशोधकांनी आपल्या चाचणीत हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, चहाचे सेवन केल्याने कोणत्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करता येते, तर चहा सेवनामुळे स्ट्रोक, हृदयाशी संबंधित आजार यामुळे निर्माण होणारा मृत्युचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं आढळून आलं. इतकंच नाही तर दररोज 2 ते 10 कप चहा पिणारे आणि दुधाचा चहा पिणारे यांनाही मृत्युचा धोका बर्‍याचअंशी कमी झालाय. याचा अर्थ अधिक चहापान करणं हे शरीरास उपयुक्त ठरू शकतं असंच या संशोधनातून दिसून आलंय.

चहाला आलेलं महत्त्व हे खरं तर ब्रिटिशांमुळेच आहे. भारतीय संस्कृतीत चहाला निश्चितच महत्त्व नाही, पण संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार चहा पिणं हे शरीरास हानीकारक नाही, तर बर्‍याचअंशी उपयुक्त ठरू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News