12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Inspirational Story of liver donor bike rider Abhishek Deshmukh from pune mh pr


आयुष्यात एक वेळ अशी येते की तुमची सर्वात मौल्यवान गोष्ट डावावर लागते. अशा परिस्थितीत निर्णय घेणे अवघड होऊन बसते. अशात माझी एक नाही तर अनेक बहुमोल गोष्टी एकाचवेळी डावावर होत्या. आणि हा डाव होता दोन जीवांच्या जगण्यामरण्याचा.

नमस्कार मित्रांनो, अभिषेक देशमुख.. बाईक रायडींग आणि व्यायाम या दोन गोष्टी माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. आज मी जो दिसतोय, तो या दोन गोष्टींमुळेच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण, एक वेळ अशी आली होती की या गोष्ट सुटतायेत की काय? अशी भिती निर्माण झाली होती.

अनोळखी ठिकाणी बाईक रायडींग करत प्रवासाचा आनंद घेणं हा माझा आवडता छंद आहे. कधी सोलो कधी ग्रुप मला काहीही चालतं. फक्त बाईक आणि सोबत गरजेपुरतं सामान इतक्याच गोष्टी मला हव्या असतात. सगळं कसं भारी सुरू असताना अचानक माझ्या वडिलांना लिव्हर सिरोसिसचे निदान झालं. त्यांना लिव्हर प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. आमच्या कुटुंबात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला होता. रोज हसतं-खेळतं कुटुंब आज एकदम शांत होतं. अगदी घरात कुणीच नसल्याचा भास होत होता. आम्हा सर्वांना सावरणारे वडीलच अंथरुणाला खिळले होते.

वडिलांसाठी लिव्हर दाता होण्याचं मला भाग्य मिळालं

शेवटी आम्हीच एकमेकांना आधार देत डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लिव्हर प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. माझ्या वडिलांसाठी लिव्हर दाता होण्याचं मला भाग्य मिळालं. त्यावेळची परिस्थिती आठवली तरी डोळ्यांच्या कडा लगेच ओल्या होतात. असो, जास्त काही आठवलं तर लिहू शकणार नाही, पुढे जाऊयात. 26 मे 2016 हा ऑपरेशनचा दिवस होता. ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. पण, दुर्दैवाने ऑपरेशननंतर तिसऱ्या दिवशी माझे अंतर्गत टाके तुटले आणि मला हृदयविकाराचा सौम्य झटका आला, मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की माझ्या जगण्याची शक्यता फारच कमी आहे. पण, वडिलांची पुण्याई आणि कुटुंबाच्या प्रार्थनेने मी त्यातून वाचलो. पण, हा आनंद जास्त काळ टिकला नाही. दुर्दैवाने माझे वडील शस्त्रक्रियेतून वाचले नाहीत. ऑपरेशननंतर 12 दिवसांनी त्यांचं निधन झालं.

नऊ महिने घरातच विश्रांती

रुग्णालयातून घरी परतलो. तब्बल 9 महिने घरीच होतो, काहीही केलं नाही, फक्त विश्रांती घेतली आणि बरा झालो. या नऊ महिन्यांत अनेकांनी मला सांगितले की मी आयुष्यभर व्यायाम आणि बाईक चालवणे (जे मला सर्वात जास्त आवडतं) यासारखी कोणतीही शारीरिक क्रिया करू शकत नाही. लोकांच्या असं म्हणण्याने मी खचलो होतो. पण, या सर्वांना कृतीतून देण्याचं ठरवलं.

माझं अर्ध ध्येय तर पूर्ण झालं.. पण, आणखी एक गोष्ट बाकी होती

मी 1 मार्च 2017 रोजी जिम जॉईन केली. वर्कआउट रूटीनसह माझ्या स्ट्रेंथ ट्रेनिंगला सुरुवात केली. 6 महिने म्हणजे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत माझं वजन चांगलं वाढलं. स्नायूंमध्ये ताकद आल्याचीही जाणीव झाली. मग 30 दिवसांत बॉडी ट्रान्सफॉर्मशन करायचं स्वतःलाच आव्हान दिलं. 1 सप्टेंबर 2017 रोजी माझं परिवर्तन सुरू झालं. यासाठी मला 100% फोकस आणि समर्पण आवश्यक होतं. आता माघार घेणं शक्य नाही, याची जाणीव मला होती. कठोर मेहनत घेतली. पोटावर मोठी शस्त्रक्रिया झाल्याने त्याचाही त्रास होत होता. पण, यासर्वांकडे दुर्लक्ष करत मी माझ्या ध्येयाकडे रोज एकएक पाऊल टाकत होतों. आता माझं अर्ध ध्येय तर पूर्ण झालं होतं. पण, आणखी एक गोष्ट बाकी होती.

वाचा – कधीकाळी बाईकला हात लावण्यास घाबरत होती, आता अमृतासह सेलेब्रिटींना शिकवते बाइक

आता ती वेळ आली होती

सहा महिन्यात मी स्वतःला मानसिक आणि शाररिकरित्या मजबूत बनवलं होतं. आता ती वेळ आली होती, ज्याने मी माझ्या ध्येयापर्यंत पोहचणार होतो. मला बाईक चालवता येणार नाही, असं म्हणणाऱ्यांना उत्तर द्यायचं होतं. जगातील सर्वात उंच आणि धोकादायक रस्त्यावर बाईक रायडींग करण्याची वेळ आली होती. मुंबई ते खारदुंगला पास हे 2 हजार 398 किमी बाईक रायडींग करणारा मी पहिला यकृतदाता आहे.

मी करुन दाखवलं

खरंतर लोकांना दाखवण्यासाठी हे मी कधीच केलं नाही. याची गरज मलाच जास्त होती. लोकांच्या तशा बोलण्याने माझं मनोबल खचलं होतं. अन् मला स्वतःचा पराभव होऊ द्यायचा नव्हता. म्हणून मी त्या सर्व लोकांचे आभार मानतो. कारण, त्या टीकाकारांमुळेच मला माझ्यातलं सत्व गवसलं.

आता एव्हरेस्ट सर करायचा..

भविष्यात मला मुंबई ते नेपाळ बाईक चालवायची आहे. आणि किमान एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला असं वाटतं की असं करणारा मी पहिलाच यकृत दाता आहे. आज यकृत प्रत्यारोपणअभावी अनेकांचा जीव जात आहे. यकृत हा असा अवयव आहे, ज्यातील काही भाग तुम्ही एखाद्याला दिला तर तो पुन्हा पूर्वीसारखा तयार होतो. अनेक लोकांना याबद्दल अजूनही गैरसमज आहे. यकृत दान केल्याने तुम्हाला कसलाही त्रास होत नाही. हिच गोष्ट माझ्या मला लोकापर्यंत पोहचवायची आहे. म्हणून हा सर्व लेखनप्रपंच.

– अभिषेक देशमुख, बाईक रायडर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News