22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Amruta khanvilkar bullet trainer founder of women on wheels amruta mane bike riding story mh pr


भर ट्रॅफिकमध्ये माझी बाईक बंद पडलेली, कर्कश्य हॉर्न वाजवत, नावं ठेवत आणि नको ते बोलत लोकं माझ्या बाजून जात होते. त्यावेळी वाटलं की देवा यातून बाहेर काढ, परत बाईकला हात लावणार नाही. कसंतरी देवाचं नाव घेत सायनला पोहचून क्लासला गेले. परतीचा वेळ होती, त्यात पिक अवर. संध्याकाळचे सात वाजले असतील. धडधड वाढत होती. असं वाटलं कुणाला तरी बोलवावं, पण बोलवणार कोणाला? आणि ज्यांची बाईक होती त्यांना तरी कसा कॉल करणार? कारण मीच खोटं बोलून माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी गाडी घेतलेली.

लहानपणी सगळ्यांनाच गाडी चालवण्याची खूपच उत्सुकता असायची. त्यात मी टिपीकल मिडलक्लास कुटुंबात मोठी झालेली. जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट नसते, तेव्हा त्याविषयची ओढ कितीतरी पटीने अधिक असते. खिशाला परवडणार नव्हती म्हणून नाही तर कोणाला गाडीच चालवता येत नव्हती म्हणून आमच्या घरी कधी गाडी आली नाही. माझे बाबा रोज शाळेत घ्यायला यायचे. पण, मी मात्र बस किंवा टॅक्सी हाच पर्याय निवडायचे.

एकवेळ मी सहज गावी मे महिन्यात गेले असताना माझ्या चुलत भावाकडे गाडी होती. बरं अडवायला आई-वडिलांपैकी कोणीच नव्हते. पहिले दोन दिवस मी फक्त बाहेर जायचे आणि कोणी नसताना बाईकवर बसून पायाने गाडी मागेपुढे करायचे. माझं झालं की पुन्हा गाडी साईडस्टँडला उभी करुन द्यायचे. माझी ही करामत एक दिवस भावाने पाहिली. मी दररोज बाईकवर बसते आणि 10 मिनिटांनी ठेऊन देते. मग, त्यानं विचारलं काय गं शिकायची आहे वाटतं? माझा आनंद जणू गगणात मावेनासा झाला.

मला अजूनही तो क्षण समोर दिसतोय जेव्हा मी पहिल्यांदा स्प्लेंडर चालवलेली. तिसरा दिवस हा माझा शेवटचा दिवस होता. कारण, मला मुंबईत परत यायचं होतं. मी थोडी का होईना, चालवत आणली. त्यात तीनचारवेळा तर बंदच पडली. त्यामुळे ओरडाही खावा लागला. पण, मुंबईला जाताना जे सोबत घेऊन गेले ते आजपर्यंत माझ्या सोबत आहे. मुंबईला आल्यानंतर मी पहिल्यांदा आई-बाबांना सागितलं, मी बाईक चालवायला शिकले. यात शिकले हे मी स्वयंघोषित केलं होतं. कारण, मग मला जे हवं होतं ते मिळालं नसतं. तेव्हा मोबाईलचं वेड नव्हतं. माझ्याकडे जो मोबाईल होतो तो कीपॅडचा होता. त्यामुळे त्यांना विश्वास बसावा म्हणून व्हिडीओ देखील काढता आला नाही किंवा आठवण म्हणून रेकॉर्ड करता आलं नाही.

जेव्हा घरी सांगायची वेळ आली तेव्हा मनातून घाबरले होते. कारण, माहिती नव्हतं की प्रोत्साहन मिळेल की ओरडा. पण, हिंमत करुन सांगून टाकलं की मला बाईक येते. मला सरावाची अजून गरज आहे, याची जाणीव मला होतीच. मला केवळ अॅक्सलेरेशन आणि संतुलन येत होतं. गेअर कधी टाकायचे आणि कधी कमी करायचे हे शिकायचं बाकी होतं. माझ्या एका वाक्यावर बाबा इतके खूश झाले की घरात एक दुचाकी घ्यायची हे त्यांनी ठरवूनच टाकलं. कारण, जसं मी आधी सांगितलं आमच्या घरी मी सोडून कोणालाच बाईक येत नव्हती. मग, ठरलं की गाडी घेऊन आईला शिकवायची म्हणजे आम्ही दोघी चालवू.

ठरल्याप्रमाणे एका आठवड्याच्या आत घरी होंडा कंपनीची अॅक्टीवा आली. एक स्कुटी, हो एक स्कुटी. मी गिअर बाईक शिकले असले तरी घेताना ठरलं की स्कुटी घ्यायची. कारण, 2010 मध्ये मुलगी बाईक चालवते हे पचनी पडणे कठीण होतं. दुसरं असं की घरी चालवणार कोणीच नव्हतं, त्यात बाईक चालवणारं तर कोणीच नाही. त्यात मला जर जमली नाही तर गाडी तशीच पडून राहिल. म्हणून मग ठरवलं स्कुटी घेऊ.

कॉलेजमध्ये गेले तेव्हा माझ्यात फिरण्याची आवड निर्माण झाली. सगळे मित्र-मैत्रिणी ट्रेनने जायचे. मी मुद्दाम माझी स्कुटी काढायचे. पेट्रोलचे पैसेपण मी माझे कँटीनचे पैसे जमा करुन भरायचे. माझी पहिली राईड मी उत्तान बिच भायंदरला केलेली. काय भारी अनुभव होता यार. आणि वाढदिवस असल्याने एक वेगळा दिवस सुद्धा साजरा केला. त्यादिवसापासून रोड ट्रीपची आवड वाढत गेली.

बरेच वर्षे स्कुटी चालवत असल्याने गेअर बाईक वरची माझी पकड कमी झालेली. बऱ्याच मित्रांना मागायचे पण कोणी देत नव्हतं. कारण, मुलगी बाईक चालवेल की नाही ह्याची त्यांना खात्री नव्हती. मागितलं तर कोण देत नाही. हे समजल्याने मी वेगळी युक्ती शोधली. मी सांगायला सुरुवात केली की मला बाईक येते चालवायला द्या. बऱ्याच मित्रांनी मस्करी केली, अनेकांनी उगाच घाबरवलं. पण, एक दिवस ठरवलेलं की आज काहीही करुन प्रयत्न करायचा. माझ्या बाजूला काका राहायचे. मी त्यांना खोटं सांगितलं की माझी स्कुटी बंद पडली आहे. तुमची बाईक उभी असेल तर घेऊन जाऊ का? माझी युक्ती कामाला आली. त्यांना वाटलं मला येते म्हणून मी मागतेय. मी रहायला दादरला होते आणि मला जायचं होतं सायनला.

सेंट्रलला जायचं तर एका बाजून एल्फिंस्टन ब्रिज तर दुसऱ्या बाजूला टिळक ब्रिज म्हणजे घरापासून परीक्षा सुरू झाली. तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. कोणता गेअर कधी टाकायचा आणि बंद पडली तर काय करायचं? कारण भावासोबत शिकताना ज्या गेअरमध्ये असायची त्या गेअरमध्ये चालवायचे. प्रत्यक्षात जेव्हा मुंबईच्या रस्त्यावर गाडी आणि तेव्हा धडकीच भरली. कारण, बिल्डींगच्या बाहेर पोहचले आणि गाडी बंद पडली. मुलगी बाईक चालवतेय म्हटल्यावर सर्वांच्या माना माझ्याकडेच वळल्या होत्या. लाजेखातर कशीबशी किक मारली आणि गाडी सुरू केली. गाडीसोबत धडधड वाढत होती. शेवटी ज्याची भिती होती, तेच झालं. टिळक ब्रिजवर फुल ट्रफिक.  आणि त्यात माझी बाईक कमीत कमी चार वेळा बंद पडलेली.

माझ्या मागे हा गाड्यांचा तांडा आणि मी वाट पाहातेय गाडी कधी सुरू होतेय. कर्कश्य हॉर्न वाजवत, नावं ठेवत आणि नको ते बोलत लोक माझ्या बाजून जात होते. त्यावेळी वाटलं की देवा यातून बाहेर काढ, परत बाईकला हात लावणार नाही. कसंतरी देवाचं नाव घेत सायनला पोहचून क्लासला गेले. परतीचा वेळ होती, त्यात पिक अवर. संध्याकाळचे सात वाजले असतील. धडधड वाढत होती. असं वाटलं कुणाला तरी बोलवावं, पण बोलवणार कोणाला? आणि ज्यांची बाईक होती त्यांना तरी कसा कॉल करणार? कारण मीच खोटं बोलून माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी गाडी घेतलेली. शेवटी धीर एकवटला. ठरवलं आपणच घेऊन जायची. जास्तीत जास्त काय होईल लोकं नावं ठेवतील. पण, एक तासाने ही लोकं आपल्या आसपास देखील नसतील.

मी क्लासवरुन निघाले. सगळे ब्रीज घेत गेले. रस्ता मोकळा होता. पण, एल्फिंस्टनला ब्रीजवर ट्रफिस असण्याची भिती मनात होतीच. माझी गाडी परत सारखी बंद पडू लागली. परत सगळे वैतागले. मुलगी आणि बाईक ह्याच्यावर प्रवचण द्यायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत एक सज्जन माणूस भेटला त्याने शांतपणे मला समजून घेतलं. मला सांगितलं जेव्हा पण गाडी थांबवतो तेव्हा गाडी पहिल्या गेअरमध्ये ठेवायची. हा धडा मी माझ्या ट्रेनिंग स्कूलमध्ये देखील वापरते.

मित्र होते पण चुका काढण्यासाठी, प्रोत्साहन कोणी दिलं नाही. सैराटचा एक फेवर आला जिथे सगळे रॉलय एनफिल्डच्या मागे लागलेले. एवढ्या दिवस मी पल्सर चालवायचे. पण, एनफिल्ड चालवण्याचा कधी योग आला नाही. पण, मी नेहमी लॉ ऑफ अॅट्रक्शन मानत गेले. जी तुमची इच्छा आहे, ती इतकी प्रबळ करा की मिळणारच. माझ्या सोबत तसच काहीसं झालं. असाच एक दूरचा भाऊ भेटायला आला होता. त्याला माझे बाईकचे किस्से सांगत गेले आणि एनफिल्ड चावण्याची इच्छा सांगितली. बोलता बोलता असं समजलं की भावाकडे एक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 होती. अगदी तसाच आनंद पुन्हा अनुभवला जेव्हा माझा गावच्या भावाने मला विचारलं होतं, गाडी शिकायची आहे का? आणि मग काय अगदी दुसऱ्या दिवसापासून रॉयल एनफिल्ड चालवायचा सुरू केली.

तेव्हा मुलगी साधी बाईक चालवते हेच पचत नव्हतं. तिथं एनफिल्ड चालवताना तर सांगायलाच नको. पण, मला गाडी यासाठी शिकायची होती. कारण, मला फिरण्याची आवड होती. यासोबत मला छोट्या छोट्या व्लॉगिंगचा छंद देखील लागलेला. मी बऱ्याच रायडर्सचे व्हिडीओ बघायचे, त्यात आपण सुद्धा असू असं देखील अनुभवायचे. ज्याची बाईक होती, तो देखील राईड करायचा. सो मला 2 in 1 पॅकेज मिळालेलं. भावासोबत जाणार म्हटल्यावर घरचेही काळजी करणार नाहीत. अशा प्रकारे माझा एडव्हेंचर प्रवास सुरू झाला.

माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं. मग पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून मला जास्त कुठं जातं आलं नाही. त्यात मित्र मंडळी कमी आणि बाईकवेडे तर त्याहून कमी. तरी हट्ट करुन मी पहिली राईड लोणावळा केली होती. स्वतःच प्लॅन केलेली. कसं जायचं, कोणतं हेल्मेट असेल, शूट कसं करणार, काहीच आयडीया नव्हती. फक्त एक लेदर जॅकेट चढवलं. घरी स्कुटीवरील हेल्मेट होतं, ते घातलं. फोन चार्ज केला आणि निघाले लोणवळ्याला. पहिलाच अनुभव होता. बॅगसुद्धा धड घेतली नव्हती. सगळं रामभरोसे होतं. माझं ध्येय फक्त 100 किमी गाठायचं होतं. अखेर बाईक घेऊन पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर आले.

असं व्लॉग करणार, तसं करणार या नादात सकाळी निघताना ना खाल्ल होतं ना पाणी प्यायले होते. वन स्ट्रेच मारायची म्हणून जास्त थांबे पण घेतले नाही. फोन स्ट्रँडसुद्धा नव्हता. मीच मॅप बघत चालवत होते. हळूहळू एनर्जी कमी होत गेली, तसा स्पीडही कमी होत गेला. उन्हामुळे अजून त्रास व्हायला लागला. पण, मनात जिद्द होती की ठरवलंय तर आता पूर्ण करुनच जायचं. 2 ते अडीच तास लागले मला लोणावळ्याला पोहचायला. रस्त्यात एक मित्र सोबत होता. पण, त्याच्या स्पीडप्रमाणे चालवत होता. बरं दमले म्हणून सांगू कसं? म्हणून तसचं पुढे चालवत राहिले. लोणावळ्याला पोहचल्यावर समजलं की हे राईडींग वाटतं तितकं सोपं नाहीय. कारण, मी अगदी रात्री ठरवलं आणि सकाळी लवकर निघाले. त्यामुळे काहीच तयारी केली नव्हती. पहिलं तर माझा फोन डेड झाला. सकाळी लवकर निघाल्याने सोबत काहीच खायला घेतलं नव्हतं. त्याहून वाईट म्हणजे पाणी प्यायले नव्हते, कारण रस्त्यात रेस्टरुम कुठं शोधणार. या राईडने मोठा धडा शिकवला. लाँग राईडला जायचं असेल तर मधेमधे ब्रेक घेऊन स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर चक्कर येऊन पडण्याची शक्यता आहे, याची जाणीव झाली.

तसच परत मुंबईल परत यायला निघालो. ताकद अजिबात उरली नव्हती. कारण, जाताना एक हुरुप होता. मला एकट्याला लोणावळा राईड करायची होती. पहिल्यांदा करतेय त्यामुळे आणखी उत्साह होता. पण, येताना परिस्थिती उलट होती. संध्याकाळ झालेली. कधी नाईट रायडींग केली नव्हती. त्यामुळे अंदाज चुकत होते. पुन्हा एकदा जेव्हा पहिल्यांदा बाईक हातात घेतली आणि देव आठवले, अगदी तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली. ह्यावेळेस बाईक चालवता येत होती. पण, राईडला जे गरजेचं होतं ते माझ्यात कमी पडलं. देवाला इतकीच प्रार्थना केली की घरी सुखरुप सोड, परत हट्ट करणार नाही. पण, मी काही हार मानणार नव्हते. रात्री 11.30 च्या सुमारास पोहचले. किलोमीटर चेक करायला गेले तर गाडीवरती धुळ पाहिली. जड झालेलं शरीर आणि विस्कटलेले बघून आतून एक आवज आला “फायनली राईड केलीस” असं वाटत होतं की जगाला ओरडून सांगावं की माझ्या मनातील भितीवर मात करत इच्छा पूर्ण केली.

पार्कींग मध्येच ठरवलं की आता प्रोफेशनल रायडरला जे लागतं, जशा गोष्टी लागतात त्या सर्वांचा अभ्यास करायचा. मग मी कोर्सेस सर्च करुन जॉईन केले. हळूहळू रायडींग हेल्मेट, सेफ्टी गार्ड, रायडींग जॅकेट आणि शूज आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर टाईमटेबल तयार करुन रायडींगला सुरुवात केली. कारण, कॉलेज आणि राईड दोन्ही मॅनेज करायचं होतं. यानंतर माझ्यासारख्या इतर मुली आणि महिलांना देखील आता बाईक शिकवण्याचा विडा मी उचलाला. त्यानंतर Women On Wheels या ग्रुप अंतर्गत मी कित्येक महिलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात मदत केली. तेही वयाच्या 21 व्या वर्षी याचा नेहमीच अभिमान वाटतो.

एक दिवस कॉलेजच्या ग्रुपमधील मित्रांना राईडसाठी तयार केलं. पूर्ण ग्रुप मुलांचा आणि मी एकटी मुलगी त्यात पण बाईकची हौशी. जेव्हढं मुलींना रेडी करायला वेळ लागत नाही. तेव्हढं ह्या मुलांना राईडसाठी तयार करायला लागला. ग्रुप राईड असल्यामुळे खूप मज्जा आली. हसत खेळत राईड पूर्ण झाली. टायगर पॉईंट्सला गेलेलो. माझी आधी लोणावळा राईड झालेली. त्यामुळे मी वेगळाच ओरा तयार केलेला. मला सगळं माहित आहे, असा अॅटीट्यूड ठेवला होता. पण, योग्य निर्णय होता. कारण, तो मुलांचा ग्रुप होता. त्यांना यापूर्वी अशा प्रकारे एक्सप्लोअर केलं नव्हतं. त्यांच्यासाठीही ही मोठी एचीव्हमेंट होती. अशाप्रकारे राईडची सवय लागली. महिन्याला एकतरी राईढ करायचे. दूर नाही जमलं तरी माझ्या Women On Wheels च्या विद्यार्थ्यांना घेऊन ब्रेकफास्ट राईड किंवा सिटीमध्ये नाईट राईडला जायचे.

मी मुंबई ते डहाणू सोलो राईडसुद्धा केली. पण, तिथे मुद्दाम दोन दिवसांचा मुक्काम केला होता. कारण, आपण उत्साहात जातो खरं पण गॅप पडल्यामुळे किंवा सतत राईडींग केल्याने अंगदुखी सुरी होते. सर्वात महत्वाचं मला राईड हेक्टीक करायची नव्हती. कारण, ही एक गोष्ट आहे, ज्यामुळे मला माझं फिरायला मिळतं. एक्सप्लोअर करायला मिळतं. त्यामुळे मला स्वतःला त्रास देऊन आवड कमी करुन घ्यायची नव्हती. डहाणू खूप सुंदर आहे. आपण बरेच बिच फिरतो, पण प्रत्येक जागेची आपली एक वेगळी खासियत असते. दादरवरुन किमान 150 किमी आहे. गुजरात हायवे बाईक राईडींगसाठी उत्तम आहे.

नंतर दीव दमन राईड झाली. जाताना खूप उत्सुकता असते. पोहचण्याची किंवा तेव्हढं अंतर पूर्ण करण्याची. पण, येताना प्रेरणा काय तर एका स्पॉट वरुन निघताना पुढच्या राईडचं प्लॅनिंग सुरु,

2019 ला हरिहरेश्वर अलिबाग राईड केली. ही अशीच नवीन वर्षाला काय करणार म्हणून आयोजित केलेली. ही राईड आम्ही खास तीन मित्रांनी एकत्र येऊन प्लॅन केलेली. कॉलेज संपून दीड वर्ष झालेलं. कोणीच कोणाच्या संपर्कात नव्हतं. अचानक भेट होता होता राईड प्लॅन केलेली. मला सवय होती, पण, त्या दोघांना थोडासा त्रास झाला. दोन बाईक आणि आम्ही तिघे असं बाईक आलटून पालटून चालवल्या. अलिबागचा रस्ता तेव्हा दुरुस्त केला जात होता. त्यामुळे आम्हाला पोहचायला उशीर झाला. जवळपास सहा तास आम्ही बाईकवर होतो. मधे गुगल मॅपने मिसगाईड केल्याने अजून उशीर झाला. तिथे पोहचल्यावर फ्रेश झालो आणि पुन्हा एक्सप्लोअर करायला बाहेर पडलो.

जस्ट लॉकडाऊन लागायच्या आधी आम्ही माळशेज घाट राईड केली. म्यानमार गेट, इगतपुरी ही राईड लॉकडाऊनच्या खूप जवळ होती. तेव्हा वाटलं नव्हतं दोन वर्ष आपल्याला फक्त आणि फक्त जुने फोटो आणि व्हिडीओ बघावे लागतील.

म्यानमाक गेट, इगतपुरी हे एक विपश्यना केंद्र आहे. जिथे लोकं राहायला येतात. 15 दिवस ते एक महिन्यासाठी. रोड चांगला असल्यामुळे स्ट्रेस अजिबात आला नाही. आमचा तीन जणांचा ग्रुप होता. त्यामुळे स्ट्रेस शेअर होत होता. पण, तिथं गेल्यावर राईड खरच का गरजेची होती? हे समजलं. आपण आनंदी राहायला खूप गोष्टी करतो. पण, मन शांत ठेवण्यासाठी पण बऱ्याच गोष्टी आहेत, हे तेव्हा समजलं. आम्ही पूर्ण विपश्यना केंद्र फिरलो. आमचे फोन काढून घेतल्याने आम्ही त्याचा मनापासून आनंद घेतला.

जसं लॉकडाऊन शिथील झाला Women ON Wheels स्टुंडंटसोबत त्यांच्या साठीची पहिली लाँग राईड केली. पुन्हा इगतपुरी होती. पण, त्यात 80% महिला होत्या. ज्या पहिल्यांदा इतक्या लांब आलेल्या.

मला वाटतं लाँग राईड करणे म्हणजे एडव्हेंचर नाही. आपल्याला मुंबईच्या रोडवर सुद्धा प्रत्येकवेळी नवा अनुभव मिळतो. काहींना रायडींग म्हणजे व्यसन लागते तर काहींना रायडींग म्हणजे आत्मिक समाधान आहे. अजूनपर्यंत मी रायडींगची शिखरं सर केली नसतील. पण, मला ज्यात आनंद आहे, ते मी करतेय. त्यातच मी आनंद शोधतेय. मी राईड सुरू केल्यामुळे मला जाणवलं की रायडींग कम्युनिटी इतकी माणुसकीने मोठी आहे की बाजुने दुसरा बाईकर गेला तरी तो तुम्हाला हाथ दाखवून प्रोत्याहन देतो. तेव्हा त्या व्यक्तीला माहितीही नसते की आपण कोण आहोत, कुठे राहतो, गाडी बंद पडली तर पहिला बाईकरच तुमच्या मदतीला धावून येतो. ही एक अशी कम्युनिटी आहे  जिथे तुमची ओळख फक्त बाईकर असेल. तुम्हाला कुठेही दुसऱ्या बाईकरकडून मदत मिळेल. अशा वेळी तुम्ही कुठल्याही जातीधर्माचे असो. मला राईडींग ह्या एका गोष्टीमुळे जास्त आवडते. कारण, पहिलं तर तुम्हाला फिरायला मिळतंय, तुम्ही स्वतःच तुमच्या मर्यादा ओलांडता आणि महत्वाचं म्हणजे हेल्मेटमागे मुलगा आहे की मुलगी हे ते काढल्यावरच समजतं. त्यासाठी तुम्ही फक्त सर्वसामान्य बाईकर असता.

मला एक बाईकरची ओळख मिळाल्यावर खूप आदर मिळायला लागला. स्टिरीओटाईप तोडता आला. ह्या प्रवासामुळेच आज मी दुसऱ्या महिलांना सक्षम करण्यासाठी पुढे येऊ शकले. आज माझ्यासारख्या बऱ्याच मुली असतील ज्यांना इच्छा आहे, पण साधन नाही, साधान आहे तर सोबत नाही. त्यांना सांगू इच्छिते की प्रयत्न करा आणि तोच प्रयत्न तुमची इच्छा पूर्ण करायला किंवा भिती दूर करायला मदत करेल. आत्ताच्या काळात मुलगा-मुलगी बरेच समान झाले आहेत. त्यामुळे जर आपण आपल्याला कमी लेखायचं बंद केलं तर नक्की आपल्याला जे हवं ते मिळवू शकतो. आज मला सांगताना आनंद होतोय की मला बाईक शिकवणारा पुरुष होता. पहिल्या राईडवरती घेऊन जाणारा पुरुष होता, ग्रुप राईडसाठी मित्र सुद्धा पुरुष होते. राईडींगचे व्हिडीओ एडीट करुन देणाराही पुरुष होता. सर्वात महत्वाचं म्हणजे घरुन परवानगी, बाईकसाठी पैसे आणि सदैव पाठी उभे राहणारेही पुरुषच आहेत.

Women ON Wheels च्या माध्यमातून आता सेलिब्रिटीदेखील माझ्याकडून प्रशिक्षण घेत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर.

– अमृता धनाजी माने, मुंबई

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News