23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

These habits damage hair now the Hair Care tips mhgm gh


मुंबई, 17 ऑगस्ट:  आपल्या केसांची काळजी सर्वांनाच असते. आजकालची धकाधकीची जीवनशैली, वाढलेलं प्रदूषण आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांचा परिणाम केसांवरही होताना दिसून येत आहे. त्यामुळेच अगदी कमी वयात केस पांढरं होणं किंवा टक्कल पडणं अशा समस्या दिसणं ही सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. केस गळण्याची समस्या तर प्रत्येक घरामध्ये किमान एका व्यक्तीला असतेच. केसांचं हे नुकसान टाळण्यासाठी केसांची योग्य निगा राखणं गरजेचं असतं; मात्र अनेकांना त्याबाबत योग्य माहिती नसते. यासाठीच केसांची निगा राखण्यासाठी काही टिप्स येथे दिल्या आहेत; ‘इंडिया डॉट कॉम’ने याबाबतचा लेख प्रसिद्ध केला आहे.

डॉ. अपर्णा संथनम (MD, DNB) या त्वचारोगतज्ज्ञ आहेत. या लेखामध्ये त्यांनी केसांच्या बाबतीत सर्वांच्या काय चुका होतात याबाबत माहिती दिली आहे. अशा चुका होत असतील, तर वेळीच त्या थांबवून तुम्ही केसांची योग्य निगा राखू (Hair Care tips) शकता. केसांना कमी तेल लावणं, केमिकलयुक्त शाम्पू वापरणं, वारंवार केस विंचरणं अशा बऱ्याच गोष्टी केसांसाठी घातक ठरू शकतात. या गोष्टी काय आहेत आणि त्यांचा कसा दुष्परिणाम होतो याबाबत डॉ. अपर्णा यांनी माहिती दिली आहे.

केमिकलयुक्त शाम्पू टाळा

सध्या बाजारात कित्येक शाम्पू उपलब्ध आहेत. त्यातल्या बहुतांश शाम्पूंमध्ये सल्फेट, पॅराबीन्स, फॉरमाल्डिहाइड अशी घातक केमिकल्स समाविष्ट असतात. या केमिकल्समुळे शाम्पू वापरताना भरपूर फेस येतो; मात्र त्याच वेळी केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. हे शाम्पू तुमच्या डोक्यावर असलेलं नैसर्गिक तेल काढून टाकतात. त्यामुळे स्काल्प म्हणजेच डोक्यावरच्या त्वचेला इजा पोहोचते. परिणामी ड्रायनेस, खाज सुटणं आणि कोंडा वाढण्यास सुरुवात होते.

हेही वाचा – डासांपासून बचाव करणारी क्रीम तुमच्यासाठी सुरक्षित आहे का?; Mosquito Repellent लावण्यापूर्वी हे वाचा

कमी केमिकल असलेल्या शाम्पूचा वापर करू शकता. सोबतच, शाम्पू वापरण्यापूर्वी केसांना भरपूर तेल लावणंही फायद्याचं ठरू शकतं. कारण यामुळे तुमच्या केसांना एक सुरक्षाकवच प्राप्त होते. रात्री झोपताना किंवा शाम्पू करण्याच्या दोन ते तीन तास आधी तुम्ही तेल लावून बसू शकता.

तेल लावण्यात हयगय नको

बरेच जण तेल लावण्यास टाळाटाळ करतात; मात्र केसांची निगा राखण्यासाठी, त्यांना पोषण मिळण्यासाठी तेल अत्यंत गरजेचं असतं. नियमित तेल लावल्याने केसांची मुळं घट्ट होतात आणि केसांची वाढ चांगली होते. खोबरेल तेल डोक्यात मुरून केसांच्या मुळापर्यंत पोहोचते. या तेलात असणारं मेदाम्ल केसांना आणि स्काल्पला आवश्यक पोषण देतं. केसांची चांगली निगा राखण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा डोक्याला तेल लावणं गरजेचं आहे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी स्काल्प चांगलं असणं अगदी गरजेचं आहे.

केस वाळवताना घ्या काळजी

केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायर किंवा ब्लो ड्रायर वापरण्याचे प्रमाण वाढलं आहे. यामुळे केसांना नुकसान पोहोचतं का हा प्रश्न कित्येकांना पडतो. तरीही अशा गोष्टींचा वापर केला जातो. खरं तर ब्लो ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न अशा प्रकारच्या गोष्टींमुळे केसांना गरजेपेक्षा अधिक उष्णता मिळते. त्यामुळे केस कमकुवत होण्यास सुरुवात होते. यासोबतच, केस वाळवताना टॉवेलने ते अगदी जोरात घासले, तर त्यामुळेही केसांचं नुकसानच होतं. त्याऐवजी केसांभोवती टॉवेल गुंडाळून ठेवणं ही केस वाळवण्याची (Hair drying tips) सर्वांत चांगली पद्धत आहे. केस वाळवण्यासाठी मऊ कॉटनचा टी-शर्ट किंवा तसं कापड वापरणंही चांगला पर्याय ठरू शकतो. हेअर ड्रायर किंवा तत्सम गोष्टी वापरण्यापूर्वी अल्कोहोल नसलेलं एखादं प्रोटेक्टिव्ह लोशन वापरणंही फायद्याचं ठरतं.

हेही वाचा – शुद्ध म्हणून पावसाचे पाणी पिण्याआधी सावधान! नवीन संशोधनात धक्कादायक दावा

स्टाइलसाठी विविध प्रकारच्या गोष्टी टाळा

केसांची स्टाइल करण्यासाठी विविध प्रकारची जेल, स्प्रे अशा गोष्टींचा वापर केला जातो. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये अल्कोहोलचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे केसांना मोठे नुकसान पोहोचतं. अशा प्रकारची जेल्स, स्प्रे वापरण्यामुळे कोंडा वाढणं, स्प्लिट एंड्स, केस कोरडे होणं, केसांचा गुंता होणं अशा प्रकारच्या समस्या जाणवतात. यामुळे अशा उत्पादनांचा वापर कमी करणं गरजेचं आहे. अल्कोहोल नसलेल्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करा. केसांच्या स्टाइलसाठी थोडंसं खोबरेल तेलही पुरेसं आहे.

सोबतच, सध्या बन किंवा पोनीटेल अशा हेअरस्टाइलचा ट्रेंड आहे. या सगळ्यामध्ये केस अगदी घट्ट बांधून ठेवावे लागतात. याचा दुष्परिणाम केसांच्या मुळावर होतो. यामुळे केस गळणं, टक्कल पडणं असे प्रकार दिसून येतात. याला ट्रॅक्शन अ‍ॅलोपेसिया म्हणतात. हे टाळण्यासाठी तुम्ही लूज पोनीटेल किंवा केस बांधण्यासाठी सिल्क स्क्रंचीजचा वापर करणं असे पर्याय वापरू शकता. सोबतच, भरपूर वेळा केस विंचरल्यामुळेही केसांना नुकसान पोहोचतं. ब्रशने वारंवार घासले गेल्यामुळे केस ओढले जाऊन तुटतात किंवा कमकुवत होतात. हे टाळण्यासाठी कमी वेळा केस विंचरा. तसंच, केसांमधला गुंता सोडवण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा.

आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालण्याचं काम आपले केस करत असतात. चांगले केस असतील, तर आपला आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे आपल्या केसांची निगा राखणं गरजेचं असतं. वरील गोष्टी टाळून तुम्ही आजपासूनच आपल्या केसांची निगा राखण्यास सुरुवात करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News