22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

सुधीरभाऊंसारखा धडाडीचा लोकनेता बघितला नाही : कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

*चंद्रपूर, दि. 4 C.Varta*:

सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील भारदस्त व्यक्तिमत्व. सुधीरभाऊ भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीच मला भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्यामुळेच निवडणुक लढण्याची पहिली संधी मिळाली. ही संधी मिळाली नसती तर मी आज या पदापर्यंत पोहचू शकलो नसतो. सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचवणारा, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सभागृहात लढणारा आणि धडाडीने कामे करणारा सुधीरभाऊंसारखा लोकनेता आजवर बघितला नाही, असे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी काढले.

‘चांदा ॲग्रो 2024’ कृषी प्रदर्शनाचे बुधवारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी ना. श्री. मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, खादी ग्रामोद्योग मंडळाचे प्रमुख रवींद्र साठे, डॉ. विनिता व्यास, जितेंद्र रामगावकर, बांबू बोर्डाचे श्रीनिवास राव, शंकरराव तोटावार, प्रीती हिरलकर, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे, राजीव कक्कड, ब्रीजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, नरेंद्र जीवतोडे, अंजली घोटेकर, रामपाल सिंग, नामदेवराव डाहुले, तुषार सोम, प्रकाश धारणे यावेळी उपस्थित होते.

ना. श्री. मुंडे म्हणाले, ‘सुधीरभाऊंनी कृषी महोत्सवाचा उद‌्घाटक म्हणून बोलावले, याचा मला कमालीचा आनंद आहे. कारण राज्याच्या कृषीमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून माझ्या हस्ते प्रथमच एखाद्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन होत आहे.’ राज्याच्या मंत्रिमंडळातही सुधीरभाऊंचे प्रचंड वजन असल्याचे ते म्हणाले. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. पण सुधीरभाऊं म्हणाले होते, ‘काळजी करू नकोस’. आणि बघा आजची कॅबिनेट बैठक झालीच नाही. बैठक असती तर मी इथे हजरच राहू शकलो नसतो, असेही ना. मुंडे म्हणाले. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात सुधीरभाऊंच्या बाजूला बसण्याचा योग येऊ शकतो, याचा आपण कधी विचारही केला नव्हता, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

चंद्रपूरकडे प्रवास करीत असताना सहज मी पूर्व आयुष्याचे सिंहावलोकन करीत होतो. अशात माझ्या आयुष्यातील खरे संकटमोचक म्हणून सुधीरभाऊच डोळ्यापुढे आले. सुधीरभाऊंशी माझे आगळेवेगळे नाते आहे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर विश्वासाने सोपवली, या शब्दांत ना. मुंडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार हे शिवभक्त आहेत. आपण शिवाचे भक्त आहोत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथून आपण असल्याचा अभिमान वाटतो, असेही ना. मुंडे यांनी नमूद केले.

*क्रांतीज्योतींच्या जयंतीचा योगायोग*
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बुधवारी जयंती होती. यासंदर्भात बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, ‘पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला लढा महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी सावित्रीबाईंच्या जयंतीचा योगायोग जुळून येणे आनंददायी आहे.’

*दांडगा पाठपुरावा*
एखाद्या कामासाठी सुधीरभाऊ दांडगा पाठपुरावा करतात. सरकारमध्ये असो की विरोधी पक्षामध्ये सुधीरभाऊ अनेक स्मरणपत्रे पाठवितात. त्यामुळे मंत्र्यांवरही एक प्रकारचा सकारात्मक दबाव निर्माण होतो, असा उल्लेख मुंडे यांनी केला.

*अशी केली परतफेड*
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे अर्थ मंत्री असताना त्यांनी चंद्रपूरसाठी निधी दिला होता. सुधीरभाऊंनी अर्थमंत्री असताना त्यांनी तटकरे यांच्या मतदार संघात भरीव निधी देत त्याची परतफेड केली, असे आगळेवेगळे विकासाचे राजकारण करणारे सुधीरभाऊ हे माझ्या पाहण्यातील एकमेव राजकीय नेते आहेत, असेही ना. श्री. मुंडे म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News