22.5 C
New York
Thursday, July 18, 2024
spot_img

कृषी, सिंचन, पर्यटन, उद्योग आणि शिक्षण या पंचसूत्रीवर जिल्ह्याचा विकास करणार मीट दी प्रेस : वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा माध्यम प्रतिनिधींशी संवाद

 

चंद्रपूर : जिल्ह्याच्या विकासाला आपले प्रथम प्राधान्य आहे. कृषी, सिंचन, पर्यटन, उद्योग आणि शिक्षण या पंचसूत्रीवर जिल्ह्याचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास आणि रोजगार उपलब्ध झालेला दिसेल असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय विकासमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी ‘मीट दी प्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक माध्यम प्रतिनिधींशी जिल्ह्याच्या विकासाच्या अजेंड्यावर संवाद साधला.
कृषी क्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारा क्षेत्र आहे. त्यामुळे विकासाठी प्रथम प्राधान्य देऊन आपण काम सुरू केले आहे. यासाठी जय किसान मिशन जिल्ह्यात सुरू करण्यात आले. मूल येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले असून, लवकरच कृषी महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत तयार होणार आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडूल सीएसआर निधीसुद्धा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. कृषीच्या विकासासाठी सिंचनाची गरज लक्षात घेता सिंचनाच्या बाबतीत जिल्हा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. वर्धा नदीवर धानोरा बॅरेज, आमडी बॅरेज, दिंडोरा बॅरेजच्या बांधकामासह माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती, शेततळे, विहिरी याबाबींवर निधी खर्च केला जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हा जगाच्या नकाशावर येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ताडोबा महोत्सव याचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन वाढल्यास स्थानिकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते त्यामुळे ताडोबा सफारी, बॉटनिकल गार्डनचा विकास केला जात आहे.

जिल्ह्यात उद्योगांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारपासून चंद्रपुरात इंडस्ट्रियल एक्स्पो सुरू झाले आहे. गुंतवणूकदारंानी ७५ हजार कोटी रुपये गुंतविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्योग आल्यास अनेकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. वनावर आधारित उद्योगासाठी एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी जिल्ह्यात विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अनेक शाळांच्या इमारती देखण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. वाचनालयाची उभारणी ठिकठिकाणी केली जात आहे. एकंदरीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत विकासकामे सुरू आहेत. मागील काही काळात तब्बल २०५ कामे पूर्ण झाली आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर शहरातील रिंग रोड, बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल, जटपुरा गेट आदी स्थानिक समस्यांवर त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. रिंगरोडचा प्रश्न लवकरच सोडविला जाणार असून, बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न आपणच सोडवू असा विश्वास त्यानी यावेळी दिला.
लोकसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, आपली लोकसभेत जाण्याची इच्छा नाही, आपण तसे वरिष्ठांनाही कळविले आहे. परंतु, पक्षाने ठरविलेच आणि संधी दिली तर मात्र आपण निवडणूक लढवू असे त्यांनी सांगितले. विकासकामे करताना अनेकजण टीका करतात. मात्र, जनता सोबत असेल, तर विरोधकांच्या टीकेला घाबरायची गरज नाही, असेही ते सांगतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्तविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, संचालन प्रवीण बत्की तर आभार साईनाथ सोनटक्के यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News