चंद्रपूर, दि.05: जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. लोकांच्या आरोग्यासाठी सहकार्याचा हात पुढे करत दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलीचे वाटप, बालकांच्या हृदयाची शस्त्रक्रिया,50 हजारपेक्षा जास्त लोकांचे नेत्र चिकित्सा शिबिर, 35 हजारपेक्षा जास्त लोकांना चष्मेवाटप तर पाच हजारपेक्षा जास्त लोकांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचा संकल्प केला असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मारोडा येथे माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या माध्यमातून व मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून भव्य नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, सरपंच (मारोडा) भिकाजी शेंडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, चंदु मारगोनवार, प्रेमदास गेडाम, जयश्री वेलकेवार, नंदु रणदिवे, प्रियंका नरमलवार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
मतदारसंघाचा विकास साधतांना येथील नागरीकांना अपेक्षित असलेली विकासकामे मार्गी लावली आहेत. असे सांगून पालकमंत्री ना. मुनगंटीवार म्हणाले, मुल ते मारोडा रस्ता, कृषी महाविद्यालय, सिमेंट काँक्रिट रोड, मारोडा रेल्वे थांबा आदि विविध कामे पुर्णत्वास आली असून या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले. मारोडा गाव विकसीत व्हावे यासाठी येथे कृषी महाविद्यालयाची उभारणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावाच्या विकास कामांसाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. मारोडा येथील तलावाचे सौंदर्यीकरण, वाचनालय, महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मारोडा प्रवेशद्वार उभारण्याची येथील गावकऱ्यांची मागणी होती, हि मागणी लक्षात घेवून प्रवेशद्वार (गेट) उभारणीसाठी वनविभागाच्या ताडोबा फाऊंडेशनच्या माध्यमातून 25 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.