महापौरांनी चंद्रपूरकरांची माफी मागावी
चंद्रपूर – 5 मार्च
कोणतेही विशेष कारण नसतांना महापौर संगिता खांडेकर यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सभेमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्याचा विषय स्थगित ठेवला. त्यामुळे स्थायी समिती गठीत करण्यास जवळपास एक महिन्याचा विलंब झाला. तसेच स्थायी समिती अध्यक्षाची निवड सुद्धा लांबणीवर गेली.
. चंद्रपूरच्या विकास कामांवर याचा गंभीर परिणाम झाल्यामुळे महापौर संगीता खांडेकर यांनी चंद्रपूर शहरातील सुमारे चार लाख नागरिकांची माफी मागावी अशी मागणी आज झालेल्या विशेष सभेमध्ये महानगर आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांनी केली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर तसेच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी देशमुख यांच्या मागणीला पाठिंबा दिला. दिनांक 10 फेब्रुवारी 2026 च्या सभेत अजेंड्यावर असलेल्या विषयानुसार सत्ताधारी पक्षातील भाजप व उबाठा -वंचित चे गटनेते तसेच विरोधी पक्षातील काँग्रेस व महानगर आघाडीचे गटनेते यांनी बंद लिफाफा मध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची नावे महापौर खांडेकर यांच्याकडे देण्याचा प्रयत्न केला.
. मात्र महापौरांनी एका नगरसेवकाच्या इशाऱ्यावरून स्थायी समिती सदस्य निवडण्याचा विषय प्रलंबित ठेवला असा देशमुख यांचा आरोप आहे.
सुधारित अर्थसंकल्प व विकास कामांना फटका
पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग तसेच मनपाच्या अनेक विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील जवळपास तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. पाणी टंचाई व स्वच्छतेच्या कामासाठी तातडीने निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.
साधारणता दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मनपा आयुक्त स्थायी समिती पुढे अर्थसंकल्प सादर करतात.
. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय सभेमध्ये या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळते. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात एखाद्या विभागाला निधीची कमतरता भासल्यास सुधारित अंदाजपत्रकामध्ये अतिरिक्त निधीची सोय केल्या जाते. सुधारित अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार संबंधित विभागाला 31 मार्च च्या पूर्वी अतिरिक्त निधी देणे गरजेचे असते. स्थायी समिती गठीत करण्यास व अध्यक्षांची निवड करण्यास विलंब झाल्यामुळे सुधारित अंदाजपत्रकाला फटका बसू शकतो. निधी अभावी काही विभागांच्या कामात यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच शहरातील सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो अशी भूमिका देशमुख यांनी आजच्या विशेष सभेमध्ये मांडली.




