*प्रशिक्षकांच्या क्षमता वाढीसाठी चंद्रपूर – गडचिरोली प्रशिक्षकांची संयुक्त कार्यशाळा संपन्न*
_प्रशिक्षण विकास संस्थेच्या बळकटीकरणावर भर, स्मार्ट उद्दिष्टे आणि प्रभावी संवाद कौशल्यावर मार्गदर्शन_
*मुल :* पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, मुल येथे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रविण प्रशिक्षकांसाठी दोन दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण विकास संस्थेची ध्येय-दृष्टी समजून घेऊन प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेत प्रशिक्षक विकास संस्थेची माहिती, उद्दिष्टे आणि दृष्टी यावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर “प्रशिक्षक कसा असावा”, “स्मार्ट उद्दिष्टे कशी ठरवावीत”, “वर्तणुकीत बदलासाठी ABCD तंत्र”, “संवाद कौशल्याचे प्रकार – समोरील उपस्थिती, श्रवण प्रतिसाद”, “प्रभावी नेतृत्व आणि निर्णय क्षमता व प्रक्रिया” तसेच “फॅसिलिटेटरची भूमिका” या विषयांवर सखोल सत्रे झाली.
PPT सादरीकरण, गटचर्चा, केसस्टडी, कृती आणि खेळीच्या माध्यमातून सर्व विषय समजावून देण्यात आले. यामुळे प्रशिक्षकांना संकल्पना केवळ समजल्याच नाहीत तर त्या प्रत्यक्षात कशा वापरायच्या याचा सरावही झाला.
कार्यशाळेच्या प्रसंगी प्रशिक्षक विकास संस्थेचे सचिव विलास सुरवसे लातूर यांनी प्रशिक्षकांच्या हितासाठी आणि संस्थेच्या बळकटीकरणासाठी मोलाचे सत्र घेऊन मार्गदर्शन केले. सहसचिव गोविंद विभुते सोलापूर , उपाध्यक्ष राहुल बागडे नागपूर, आणि देविदास पवार लातूर यांनीही प्रशिक्षकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुलचे प्राचार्य गरपलीवार यांनी आधुनिक तंत्र ध्यानाचा वापर व त्याचे महत्व या संबंधित मोलाचे मार्गदर्शन केले व प्रशिक्षणासाठी केंद्र उपलब्ध करून दिले.
या कार्यशाळेत 48 प्रशिक्षकांनी सहभाग घेतला. नियोजन आणि आयोजन गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रभू गवारे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुधीर राजगडकर, सचिव अनिल वाकडे तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या आयोजक समिती आणि सर्व प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले .
सर्व प्रशिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यशाळा यशस्वी झाली. उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रशिक्षकांचे आयोजकांतर्फे मनापासून आभार मानण्यात आले.




