वरोरा, प्रति
कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी वरोरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही *कारगिल विजय दिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक *आजी-माजी सैनिक संघटना, पैगाम सामाजिक साहित्य मंडळ आणि मोरेश्वरराव टेमर्डे चॅरिटेबल ट्रस्ट* यांच्या संयुक्त विद्यमाने हा राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
*प्रभात फेरी आणि दीप प्रज्वलनाने सुरुवात*.
कार्यक्रमाची सुरुवात *वरोरा येथील शहीद योगेश डाहुले चौकातील शहीद स्मारकासमोर दीप प्रज्वलन* करून झाली. त्यानंतर वरोरा येथील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची *भव्य प्रभात फेरी* काढण्यात आली. हात तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थी रस्त्यावरून गेले. परिसरातील नागरिकांनी या फेरीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
*सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्गदर्शन*
सायंकाळी आयोजित कार्यक्रमात *देशभक्तीपर गीतांवर आधारित विद्यार्थ्यांची बहारदार नृत्य स्पर्धा* पार पडली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर मान्यवरांचे प्रबोधनपर भाषणे झाली. यावेळी *प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार देवराव भोंगळे आणि आमदार करण देवताळे* उपस्थित होते. त्यांनी कारगिल युद्धातील सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून युवा पिढीने देशासाठी समर्पित भावने काम करावे असे आवाहन केले.
*शहीदांचे स्मरण, येणाऱ्या पिढीला प्रेरणा*
कारगिलच्या युद्धभूमीवर आपल्या वीर सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याची आठवण येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठीच दरवर्षी वरोरा येथील सामाजिक संस्था आणि आजी-माजी सैनिकांच्या संघटना हा सोहळा साजरा करतात, असे आयोजकांनी सांगितले.
*मान्यवरांची उपस्थिती*
या कार्यक्रमाला *वरोरा, वणी, भद्रावती आणि चंद्रपूर येथील माजी सैनिक*, *वरोरा नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, भद्रावती नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, अशोक वर्मा, जयंत टेमर्डे, सुरेश बोभाटे, प्रकाश चिकटे* यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी *पैगाम सामाजिक साहित्य मंडळ, माजी सैनिक संघटना, एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर, जयजवान जयकिसान संघटना आणि बेस्ट सिक्युरिटी एजन्सी* यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कारगिल विजय दिनानिमित्त संपूर्ण वरोरा शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.




