Sunday, June 21, 2026
Google search engine
spot_img

योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा* – *जिल्हाधिकारी पंत*  *आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांनी केली योगासने*

*योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा*
– *जिल्हाधिकारी पंत*

 *आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांनी केली योगासने*

चंद्रपूर, दि. 21 : आजचे जीवन हे धावपळीचे झाल्यामुळे मानव हा सतत मानसिक आणि शारीरिक तणावात असतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. यावर मात करण्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविला तर आपण निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त राहू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, खेलो इंडिया, शिक्षण विभाग आणि पंतजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.21) जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी पंत बोलत होत्या. यावेळी चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थित होते.

योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जागतिक स्तरावर योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. रोज एक तास आपण नियमितपणे योगा केला तर आपले आजार आणि मानसिक तणाव नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांनी निरोगी जीवनासाठी योगासने करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, पुरातन काळापासून भारतात योग अस्तित्वात आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय योगाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. माणसाचे आयुष्य निरोगी राहण्यासाठी रोज योगा करावा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईची बॅटरी रोज चार्ज करतो, त्याचप्रमाणे किमान 1 तास योगा केला तर आपण निरोगी राहू, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

तर महापौर संगिता खांडेकर म्हणाल्या, योगामुळे आपला फायदा असून निरोगी राहण्यास मदत होते. नियमितपणे योगा करावा व तंदुरुस्त राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांनी केले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक संदीप उईके, नंदू आवारे, खेलो इंडियाचे प्रशिक्षक रोशन भुजाडे, पतंजली योग समितीचे सुधाकर श्रीपूरकर, वैजंती गहूकर, शुभांगी डोंगरवार, निलिमा चरडे, अरुणा शिरभये, कविता मंघानी, सुभाष राजुरकर, सविता कोट्टी, संजय मंघानी, रोशन बावणे, सुवर्णा लोखंडे, प्रिती येलीचपुरवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

*उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार* : जागतिक योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणारी ज्योती देऊरकर, मिशन लक्षवेध मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेलो इंडियाचे अंकिता चव्हाण आणि सोहम मोरे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*जलतरण तलावातही योगासने* : मुख्य शासकीय कार्यक्रमापूर्वी जिल्हा क्रीडा संकूल येथील जलतरण तलावात 89 वर्षीय कृष्णाजी नागपूरे यांच्यासह सूवर्णा नागपुरे कामडे, संजीव कुमार जयपुरकर आणि प्रदीप मोहनापुरे यांनी ‘वॉटर योगा’ करून उपस्थितांची मने जिंकली.

*उपस्थितांनी केली ही योगासने* : यावेळी उपस्थितांनी स्कंदचक्रासन, घुटनासंचालन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्टासन, उत्तांगपंडूतासन, वक्रासन, भुजंगासन, उत्तंगपादासन, पवनउत्तासन, शवासन, कपालभारती प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम, अनुलोमविलोम आदी योगासने केली.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments