Saturday, June 20, 2026
Google search engine
spot_img

शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करा; नर्सिंग कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्याची उपसरपंच अशोक चौधरी यांची मागणी

शंकरपूर (ता. चिमूर):

. शंकरपूर येथील लोकसंख्या १० हजारांपेक्षा अधिक असून परिसरातील अनेक गावांतील नागरिक आरोग्य सेवेसाठी शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येची आरोग्य जबाबदारी सध्या केवळ बीएएमएस डॉक्टरांच्या भरवशावर चालत असून केंद्रात नियमित एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शंकरपूर हे परिसरातील मध्यवर्ती गाव असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. अपघात, सर्पदंश, गंभीर आजार, गर्भवती महिलांची तपासणी तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सेवेची आवश्यकता भासते. मात्र एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना चिमूर किंवा जिल्हा मुख्यालयाकडे धाव घ्यावी लागते.
याशिवाय आरोग्य केंद्रात नर्सिंग कर्मचाऱ्यांचीही कमतरता असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. वाढती लोकसंख्या आणि परिसरातील गावांचा वाढता भार लक्षात घेता शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करणे अत्यावश्यक झाले आहे.
त्यामुळे शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करावेत, नर्सिंग कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत तसेच आरोग्य सुविधा अधिक सक्षम कराव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत शंकरपूरचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
संबंधित विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी. अन्यथा शंकरपूर व परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिला आहे.
“१० हजारांहून अधिक लोकसंख्येच्या शंकरपूरला एमबीबीएस डॉक्टर कधी मिळणार? – उपसरपंच अशोक चौधरी यांचा सवाल”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments