ब्रम्हपुरी,ता.२२: प्रसिद्ध विधिज्ञ, कुणबी समाजाचे नेते आणि आंबेडकरी चळवळीत सहभाग घेणारे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील खंबीर नेतृत्व असलेले धडाडीचे नेते अॅड. संजय ठाकरे यांना शिंदे शिवसेनेच्या प्रमुख नेतृत्वाने मुंबईला बोलावल्यामुळे ते मुंबईला रवाना झाले आहेत.
ब्रम्हपुरी विधानसभेची उमेदवारी भाजपा कि शिवसेना ( शिंदे गट ) यात खलबते सुरु असून, भाजपाचे दावेदार प्रा.अतुल देशकर यांना वनविकास महामंडळ दिल्यामुळे भाजप दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामध्ये ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र हे ब्रम्हपुरी-सावली-सिंदेवाही अशी तीन तालुके मिळून असल्याने क्रिष्णा सहारे, प्रशांत वाघरे व ॲड.संजय ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. तथापि, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कुणबी मतदारांचा वरचष्मा असल्याने उमेदवार कुणबी व्यक्ती पाहिजे, तो भाजपाचा असो कि शिवसेनचा चालेल; परंतु कुणबीच व्यक्ती हवा अशीच सर्वत्र चर्चा आहे.
क्रिष्णा सहारे यांचे गाव चिमूर मतदारसंघात आहे. त्यामुळे सावली व सिंदेवाही तालुक्यातील लोकांचा त्यांना विरोध आहे. शिवाय त्यांचा संपूर्ण ब्रम्हपुरी तालुक्यातही फारसा संबंध नाही. प्रशांत वाघरे अनेक वर्षांपासून गडचिरोलीत वास्तव्य करतात. त्यांचे दलित आणि इतर समाजाशी फारसे जिव्हाळ्याचे संबंध नाहीत. त्यामुळे त्यांनाही विरोध दिसून येत आहे. ॲड. संजय ठाकरे हे ब्रम्हपुरी-सावली-सिंदेवाही या तीनही तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या वांद्रा येथील रहिवासी आहेत. पंचक्रोशीत सामाजिक कार्य करणारे वकिल म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचा या क्षेत्रात जनसंपर्क आहे. त्यामुळे ॲड. संजय ठाकरे याना तिन्ही तालुक्यातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. तसेच कुणबी समाजाचे नेतृत्व करीत असल्याने अॅड. ठाकरे हे समाजासह इतर समाजाच्या लोकांमध्ये प्रिय आहेत.
सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेकडून उभे राहून त्यांनी तिसऱ्या क्रंमाकाची मते मिळविली होती. तेव्हापासून ते सतत लोकांच्या संर्पकात असून, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. मागील महिन्यात कांग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत व्याहाड येथे पार पडलेल्या कुणबी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ॲड. संजय ठाकरे हे होते. असे असताना अचानक शिवसेना ( एकनाथ शिंदे ) गटाकडून त्यांना मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून ॲड. संजय ठाकरे कुणबी समाजाची व्यक्ती काँग्रेसच्या बलाढ्य उमेदवारांना टक्कर देऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ॲड. संजय ठाकरे यांना शिंदे गटाकडून तातडीने मुंबईला बोलावले असल्याचे वृत्त आहे.