Monday, January 20, 2025
Google search engine

पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल, पण सुधीरभाऊंना मंत्रिपद हवेच* *चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही*

Candrapur

राज्याचे हेविवेट नेते आणि भाजपाची मुलुख मैदानी तोफ सुधीर मुनगंटीवार यावेळी मंत्रिमंडळात नाहीत. भाजपची सत्ता आली आणि मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाहीत, असे आजवर कधी घडलेच नव्हते. पण यावेळी हे विपरीत घडले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मुनगंटीवार स्वतः नाराज नाहीत. पण त्यांच्या समर्थकांनी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे. अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहेत. चंद्रपुरातील अनेक लाडक्या बहिणींचे ऊर आपल्या भावाचं नाव नसल्यानं भरून आलं आहे. ज्यांच्यासाठी मुनगंटीवार धावून गेले असे अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक, निराधार माता-भगिनी, विद्यार्थी, शेतकरी यांचा कंठ दाटून आला आहे. मुनगंटीवार यांनी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतली असली तर आम्ही गप्प राहणार नाही, असं या सगळ्यांची ठरवलं आहे. त्यातूनच मुनगंटीवार यांचे चाहते चंद्रपुरातून पायीच निघाले,पुढे ते नागपूर नंतर दिल्लीकडे कूच करणारं आहे.*

चंद्रपूरपासून दिल्ली गाठेपर्यंत आमचे पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल पण सुधीरभाऊंना मंत्रिपद मिळायलाच हवं, अशी भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे. मुनगंटीवार यांचे चाहते एक एक करीत या अनोख्या पदयात्रा सत्याग्रहात सहभागी होत आहेत. त्यांना एकच उत्तर हवं आहे. का सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून ऐनवेळी का वगळण्यात आलं. सुरुवातीला हे सगळे कार्यकर्ते नागपूर येथे पायी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीकडे कूच करणार आहेत.

*मागणी रास्तच*

‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे राज्यगित ज्यांनी दिलं त्या सुधीर मुनगंटीवार यांनाच दिल्ली मंत्रिपदापासून कशी काय वंचित ठेऊ शकते असा प्रश्न या सगळ्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. कार्यकर्त्यांची चंद्रपूर ते नागपूर अशी पदयात्रा मंगळवारी दुपारी (17 डिसेंबर) सुरू झाली आहे. नागपूरमध्ये या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर ठिक अन्यथा त्यांनी पुढचा प्रवास दिल्लीच्या दिशेने करण्याचा पक्का निर्धार केला आहे.

चंद्रपूरमधून निघालेले हे कार्यकर्ते या थंडीत तहान-भूक विसरून पायपीट करीत राहणार आहेत. पडोली, भद्रावती, वरोरा, खांबाळा या भागातून कार्यकर्ते या पदयात्रेत जुळले जाणार आहेत. नागपुरात पोहोचेपर्यंत या सत्याग्रह पदयात्रेतील कार्यकर्त्यांची संख्या मोठी होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा आहे.

*कारवां बढता रहे..*

‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’, अशी मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. आपल्या 30 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी माणसं जोडली. त्यामुळं त्यांच्यासाठीही आता चाहत्यांचा ‘कारवाँ’ तयार होत आहे. सद्य:स्थितीत फारुख शेख, हरीश व्यवहारे, सुरज पारखी, अमित तामटकर, अरविंद बोरकर, देवानंद थोरात, भोजराज शिंदे, मनोज ठेंगणे, दीपक सिंग आदी कार्यकर्ते चंद्रपुरातून निघाले आहेत. मात्र ही संख्या आता वाढत जाणार आहे. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावातून सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते या सत्याग्रह पदयात्रेत जुळत जाणार आहेत.

मी नाराज नाही. नाराज होणारा मी माणूस नाही. पण मंत्रिमंडळात माझा समावेश आहे, हे निश्चित झाले होते. शपथविधीचा दिवस आल्यावरही मला फोन आला नाही. यामागचे कारण मला कळले नाही. मला ते कारण जाणून घ्यायचे आहे. बाकी मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडेल. पूर्ण शक्तीने जबाबदारी पार पाडणे, हे माझे कर्तव्य आहे. हे कर्तव्य मी आजपर्यंत निभावत आलो. यापुढेही निभावत राहणार आहे, असे मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळं कधीही न हरणाऱ्या मुनगंटीवार यांच्यासाठी लढवय्ये कार्यकर्तेही सज्ज झाले आहे.

*सातव्यांदा आमदार*

चंद्रपूर जिल्ह्यातून सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत जी काही कामे दिसत आहेत, ती त्यांच्यामुळेच झालेली आहेत. सुधीर मुनगंटीवार नसते, तर चंद्रपूर जिल्हा 20 वर्ष मागे असता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने आम्ही चांगलेच नाराज आहोत. आम्ही येथून पदयात्रेने नागपूरला जाणार आहोत. तेथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. येथे आमचे काम झाले तर ठीक. नाहीतर तेथूनच पुढे पदयात्रेने दिल्लीला जाऊ. दिल्लीत आमचं म्हणणं मांडू. जोपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळत नाही, तोपर्यंत आमची पावलं थांबणार नाहीत. पायांतून रक्ताच्या धारा निघाल्या तरी ही पावलं थांबणार नाही, अशा भावना चंद्रपूर येथून पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments