चंद्रपूरमध्ये भव्य आणि सुसज्ज मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होणार आहे. येथे कॅन्सर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे तसेच महिलांसाठी 100 खाटांचे रुग्णालय उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मेडिकल टूरिझम हब म्हणून विकसित करण्याच्या संकल्पपूर्तीची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यापासून करावी आणि चंद्रपूरला मेडिकल टूरिझम हब म्हणून विकसित करावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
रविवारी सन्मित्र महिला सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर होते. या वेळी आमदार जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. चंद्रपूरमध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरातील रुग्णांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्राला मेडिकल टूरिझम हब बनविण्याचा संकल्प असल्याचे बोलून दाखविले होते. त्यानंतर आता आमदार किशोर जोरगेवार यांनी ही मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.
चंद्रपूरला मेडिकल टूरिझम हबचा दर्जा मिळाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. चंद्रपूरची भौगोलिक परिस्थिती पाहता हे शहर देशाच्या मध्यभागी आहे. तसेच येथे सिकल सेल यासह अनेक मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालये आहेत. या सर्व उपलब्ध सुविधांचा लाभ घेत, हे ठिकाण राज्याच्या आरोग्य पर्यटन नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येऊ शकते. वैद्यकीय पर्यटन वाढल्यास हॉस्पिटल्स, औषध उद्योग, हॉटेल्स, वाहतूक आणि इतर संबंधित सेवा क्षेत्रांना फायदा होईल असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
भावी डॉक्टरांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. त्यांना योग्य शिक्षण या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून दिले जाईल. चंद्रपूर हा राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने लगतच्या राज्यातील रुग्णांनाही उत्तम वैद्यकीय सेवा देता येईल, असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.