Thursday, March 20, 2025
Google search engine

श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवातून उत्कृष्ट खेळाडू घडावेत – आ. किशोर जोरगेवार खुटाळा येथे राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा संपन्न, नागपूर संघ ठरला विजेता

खेळ केवळ मनोरंजनाचा किंवा शरीरतंदुरुस्तीचा भाग नाही, तर तो शिस्त, संघर्ष, जिद्द आणि विजयाच्या प्रवासाचे प्रतीक आहे. आज येथे महाराष्ट्रभरातील नामांकित संघांनी सहभाग घेतला आहे, ही निश्चितच क्रीडा क्षेत्रासाठी उत्साहवर्धक बाब आहे. हँडबॉल सारखा वेगवान आणि चपळाईचा खेळ खेळताना, प्रत्येक खेळाडूने खेळाडूवृत्ती, संघभावना आणि मेहनतीचे महत्त्व लक्षात ठेवावे. या क्रीडा महोत्सवातून देश पातळीवर राज्याचे नाव लौकिक करणारे उत्कृष्ट खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आरोही बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने खुटाळा येथे राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनचे सचिव रणधीर सिंग, आरोही बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धीरज वर्मा, अशोक मत्ते, क्रीडा संयोजक बाल्मीक खोब्रागडे, खुटाळा माजी सरपंच गुड्डू सिंग, हँडबॉल असोसिएशन चंद्रपूरचे सचिव प्रकाश दुमाने, राशिद हुसेन, नकुल वासमवार, अमोल शेंडे, स्वप्निल पटकोटवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, राज्यभरातील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत आणि ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला नवीन दिशा मिळेल. संघर्ष हाच खरा विजय असून सामना जिंकणारा संघच नाही, तर या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू विजयासाठी पात्र आहे. खेळाच्या माध्यमातून सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र घडविण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे.

आपण दरवर्षी श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत असतो. यंदाही हे यशस्वी आयोजन सुरू असून आपण विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचेही आयोजन केले होते. यात विदर्भातील १५० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आपण आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेमुळे चंद्रपुरात अनेक कुस्तीपटू घडत आहेत. असे आयोजन नियमित करण्याचा पुढेही आमचा प्रयत्न असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ही स्पर्धा म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही, तर ती महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला मिळालेली नवी दिशा आहे. जीवनात संघर्षाला कसे सामोरे जायचे, अपयशावर मात करून यश कसे मिळवायचे, हे खेळ आपल्याला शिकवतात. त्यामुळे ‘खेलो इंडिया’, ‘फिट इंडिया’ अशा मोहिमांद्वारे सरकारही क्रीडा क्षेत्राला भरघोस पाठबळ देत आहे. विजय किंवा पराजय हा क्षणिक असतो, पण जिंकण्याची मानसिकता आणि खेळाडूवृत्तीच तुम्हाला आयुष्यात मोठे बनवते. मैदानात उतरताना फक्त सामना जिंकायचा असा विचार न करता, खेळाचा आनंद घ्या, स्वतःला सिद्ध करा, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

या स्पर्धेत राज्यभरातील संघांनी सहभाग घेतला होता. २० वर्षांनंतर प्रथमच हँडबॉल स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले होते. काल, रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. यात नागपूर संघाने २६-११ अशा फरकाने अमरावतीच्या संघावर  दणदणीत विजय मिळविला. तर तृतीय क्रमांकासाठी झालेल्या कोल्हापूर विरुद्ध मुंबई या संघाच्या सामन्यात मुंबई संघाने २४-१० च्या फरकाने कोल्हापूर संघाचा पराभव केला. त्यानंतर हँडबॉल असोसिएशन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अध्यक्ष अनिल धानोरकर, राज्य संघटनेचे पदाधिकारी सोर, नामदेव डावले, गुड्डू सिंग, मनोज ठेंगणे, विकी रामकृष्ण आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाला पुरस्कार वितरित करण्यात आला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments