सरदार पटेल महाविद्यालयात १८ मार्चला संशोधनाविषयी राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळा..
चंद्रपूर – येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग,रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज’ (संशोधन केंद्र) व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टेपिंग इनटु रिसर्च प्रिसिंक्ट : मेथॉडॉलॉजी, पब्लिकेशन अँड पेटंट्स’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयात येत्या मंगळवार दि. १८ मार्च रोजी करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या उद्घाटनच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे असून यावेळी ‘स्पोर्ट्स सायकॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. अनिल करवंदे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. समारोपीय कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील डॉ. बी. आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामदास आत्राम हे प्रमुख अतिथी राहणार आहेत, तर यावेळी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील.
संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. संशोधन क्षेत्रात सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात. आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात संशोधन पद्धतीत अनेक आमुलाग्र बदल घडत आहेत. तेव्हा त्याची पद्धती, प्रकाशने आणि बौद्धिक संपदा (पेटंट) यावर नेमके मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, जाणकार मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई येथील डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे प्रोफेसर डॉ. सेल्वी जोस व नागपूर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. तपन दत्ता, तर नागपूर येथील ‘लेक्स रेगिया एलएलपी’ कंपनीच्या सर्वेसर्वा तथा सिनियर आयपीआर अटर्नी डॉ. उशोषि गुहा या मार्गदर्शन करणार आहे.
या कार्यशाळेचा लाभ प्राध्यापक, शिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधकांनी घेण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज’चे प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर व समन्वयक डॉ. रक्षा पी. धनकर यांनी केले आहे