Wednesday, April 23, 2025
Google search engine

परदेशात शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती अदा करा – आ. किशोर जोरगेवार.

नागपूर विभागातील 16 आणि संपूर्ण महाराष्ट्रातील 76 ओबीसी विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र, शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा दुसरा हप्ता अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीत आले असून, परदेशी विद्यापीठांकडून शुल्क भरण्यासाठी दबाव वाढत आहे. निधी वेळेवर न मिळाल्यास शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर शिष्यवृत्ती तातडीने अदा करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन सदर मागणी केली. राज्य शासनाकडून ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे शिक्षणासाठी मोठा आधार मिळतो. मात्र, निधी मिळण्यात झालेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेक विद्यार्थ्यांना राहण्याचा खर्च भागवणे कठीण झाले आहे, तर काहींवर विद्यापीठाचे शुल्क भरण्यासाठी दबाव वाढला आहे. शिष्यवृत्तीचा निधी अद्याप न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. वेळेवर शुल्क भरता न आल्यास काही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होण्याची भीती आहे, तर काहींना वैयक्तिक कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेल्या अडचणी सोडवून रखडलेला निधी तात्काळ अदा करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments