चंद्रपूर १८ वर्षीय युवतीची फसवणूक करून मध्यप्रदेशात विक्री
चंद्रपूर वार्ता : दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत १८ वर्षीय युवतीची फसवणूक करून तिला मध्यप्रदेशात नेऊन दीड लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचा तसेच जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित युवती ही गेल्या काही महिन्यांपासून कॅटरिंगच्या कामावर मजुरी करत होती. २१ डिसेंबर २०२५ रोजी घरातील वादानंतर ती मैत्रिणीसोबत भद्रावती येथे विभा उर्फ पिऊ प्रतीक धोटे यांच्या घरी गेली होती. त्यानंतर देवदर्शनाच्या बहाण्याने विभा उर्फ पिऊ धोटे व विक्की
दीड लाखांत जबरदस्तीचे लग्न
लारोकर यांनी तिला रेल्वेने कुबेश्वरधाम, मध्यप्रदेश येथे नेले. काही दिवस तेथे ठेवल्यानंतर तिला मुगलखेडी, जिल्हा राजगढ येथे नेण्यात आले.
६ जानेवारी २०२६ रोजी आरोपींनी स्टॅम्प पेपरवर लिखापढी करून पीडित युवतीचे भगवान सिंह गोपीलाल मौगिया याच्याशी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा आरोप आहे. लग्नानंतर पीडितेवर शारीरिक व मानसिक दबाव टाकण्यात आला. काही दिवसांनी तिने संधी साधून आपल्या भावाशी संपर्क साथत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. आपली दीड लाख रुपयांत विक्री करण्यात आली असून पैसे परत दिल्याशिवाय सोडणार नाही, असा दबाव आरोपींकडून टाकण्यात येत असल्याचे तिने सांगितले.
यानंतर दुर्गापूर पोलिसांच्या
मदतीने पीडित युवतीला मध्यप्रदेशातून सुरक्षितपणे परत आणण्यात आले. अखेर ३० जानेवारी २०२६ रोजी पीडितेने विभा उर्फ पिऊ प्रतीक धोटे, विक्की लारोकर, लक्की प्रतीक थोटे व इतर आरोपीविरोधात भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम १४३(२), ३(५) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून मानवी तस्करी व जबरदस्तीच्या विवाहप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे




