*वरोरा येथील पैगाम संस्थेचा स्तुत्य उपक्रम : 24 जि.प. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप*
*वरोरा, जि. चंद्रपूर :* पैगाम साहित्य, सामाजिक मंडळ, वरोरा च्या वतीने तालुक्यातील 24 जिल्हा परिषद शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल, स्कूल बॅग यासह आवश्यक साहित्य देण्यात आले.
शेगाव, मेसा, महालगाव, तुळणा, कळमगव्हाण, करंजी, मारडा, आष्टी, बोरगाव, सालोरी, खेमजई, भटाळा, नांद्रा, लोधीखेडा, सोनेगाव, गुंजाळा, वडधा, उमरी, साखरा, वडगाव, आबमक्ता, वनोजा यासह एकूण 24 गावातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना या मदतीचा लाभ मिळाला.
> “हिम्मत द्या थोडी, उसळू द्या रक्त, पैसा बीसा काही नको, दप्तर द्या फक्त” अशी आर्त हाक परिसरातील गोरगरीब विद्यार्थी देत असतात. शिक्षणाची दुर्दम्य इच्छा असूनही परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. अशाच गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम पैगाम मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे.
पैगाम संस्थेने गेल्या 58 वर्षांपासून महामूर्ख संमेलनाचे आयोजन करून अनेक नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यासोबतच कारगिल विजय दिवसाचे आयोजन करून देशाच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, धान्य व किराणा किटचे वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून संस्थेने समाजात आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव अशोक वर्मा, जयंत टेमुर्डे, राहिल पटेल, दिलीप उमरे, खिरतकर, अशोक धात्रक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.




