Thursday, May 28, 2026
Google search engine
spot_img

ताडोबा परिसरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; जंगलालगतच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी – उपसरपंच अशोक चौधरी

ताडोबा परिसरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; जंगलालगतच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी – उपसरपंच अशोक चौधरी
चंद्रपूर प्रति

.  जिल्ह्यातील ताडोबा परिसर आज देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले असून जंगल सफारी, रिसॉर्ट व्यवसाय व पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जंगलालगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांचे जीवन दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालले असून वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडेच सिंदेवाही परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी, गुराखी, तेंदूपत्ता मजूर, आदिवासी बांधव तसेच जंगलावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना रोज जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते ताडोबा परिसरात २५० पेक्षा अधिक वाघ असल्याचा दावा करण्यात येत आहे. वाघ संवर्धन ही निश्चितच अभिमानाची बाब असली तरी वाढत्या वाघसंख्येसोबत जंगलालगतच्या गावांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वाघांचे गावाजवळ दर्शन होत असून शेतात, रस्त्यावर, नाल्यांमध्ये तसेच मानवी वस्तीजवळ वाघ फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंगल पर्यटनातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असताना जंगलालगतच्या गावांमध्ये मात्र मूलभूत सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पर्यटनाला कोणाचाही विरोध नसून विकासासोबत सामान्य नागरिकांच्या जीवित सुरक्षेलाही प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
उपसरपंच अशोक चौधरी यांनी शासन व वनविभागाकडे खालील मागण्या केल्या आहेत :
• जंगलालगतच्या गावांमध्ये विशेष वनसुरक्षा पथके तैनात करण्यात यावीत
• वाघांच्या हालचालींची माहिती नागरिकांना तात्काळ मिळण्यासाठी अलर्ट प्रणाली सुरू करण्यात यावी
• जंगलात जाणाऱ्या तेंदूपत्ता मजूर, शेतकरी व गुराख्यांना सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे
• प्रभावित कुटुंबांना तातडीने व योग्य आर्थिक मदत देण्यात यावी
• मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात यावा
• पर्यटनातून मिळणाऱ्या निधीचा काही हिस्सा जंगलालगतच्या गावांच्या सुरक्षेसाठी खर्च करण्यात यावा
• जंगल परिसरात सीसीटीव्ही, ड्रोन सर्वेक्षण व नियमित गस्त वाढविण्यात यावी
• नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग, महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने संयुक्त उपाययोजना कराव्यात
“वाघ वाचवा” ही मोहीम जितकी महत्त्वाची आहे तितकेच जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांचे प्राणही महत्त्वाचे आहेत. जंगल संवर्धन आणि मानवी सुरक्षितता यामध्ये समतोल राखणे ही काळाची गरज असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी म्हटले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments