कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर सरकार मधील काही मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावती येथे शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत संबंधीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
महायुती सरकार ला प्रत्येक घटकाने मदत केल्यानेच महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. परंतु या सरकार मधील कृषी मंत्री यांनी पिक विम्या संदर्भात भिकारी देखील एक रुपया घेत नाहीत परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देतो, असे वादग्रस्त विधान करुन शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा दिली. या विधानाचा महाराष्ट्रातून निषेध होत असतांना खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आपल्या मंत्र्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्यांच्यामुळे आज आपण जगत आहोत याचा विसर कृषी मंत्र्यांना पडला असावा, असे मत खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केले आहेत. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांवर कार्यवाही ची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.