*रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी फिल्डवर*
*Ø क्षेत्रीय भेटीदरम्यान जाणून घेतल्या मजुरांच्या समस्या*
चंद्रपूर , दि 24 एप्रिल : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्षेत्रीय भेटी देऊन विकासकामांची पाहणी करीत आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत असला तरी त्याची पर्वा न करता भर उन्हात जिल्हाधिका-यांनी पोंभुर्णा तालुक्यात भेट देऊन मजुरांशी संवाद साधला.
23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घनोटी तुकूम येथील मजगी कामाची पाहणी केली. यावेळी तेथे कामावर असलेल्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन सुध्दा केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी तालुक्यातील विविध विकासकामांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेतला.
क्षेत्रीय भेटीदरम्यान मौजा आंबेधानोरा येथे अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी कार्यालयाची तपासणी करून मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा उमरी पोतदार येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच बळीराजा शेत पाणंद रस्ताच्या कामाला भेट दिली. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयातील वार्ड, भरती असलेले रुग्ण, त्यातील यंत्र सामुग्री, औषध उपलब्धता व इतर आरोग्य विषयक सोई सुविधाबाबत तपासणी करून आढावा घेतला. तसेच पोंभूर्णा येथील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे अगरबत्ती प्रकल्पाची सुध्दा त्यांनी पाहणी केली. मौजा चिंतलधाबा येथील ग्रामपंचायत क्रीडांगण काम, मनरेगा अंतर्गत 650 वृक्ष लागवड केलेल्या कामास भेट देऊन मार्गदर्शन केले.
सदर दौ-याच्या वेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार, जि.पं.बांधकाम उपविभागीय अभियंता श्रीमती जोशी, पोलीस निरिक्षक राजकमल वाघमारे, नायब तहसिलदार रामकृष्ण उईके, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके व सुरेंद्र चिडे यांच्यासह गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सहा.कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, ग्रामरोजगार सहाय्यक व गावातील नागरीक उपस्थित होते.
*25 एप्रिल रोजी पालकमंत्री चंद्रपुरात*
चंद्रपूर , दि 24 एप्रिल : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 25 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, सकाळी 10.30 वाजता चंद्रपूर येथे इरई नदीचे पुनरुज्जीवन व खालीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता वन अकादमी येथे वन विभागाची आढावा बैठक, दुपारी 2 वाजता गडचिरोली कडे
वैधरित्या चालणाऱ्या बालगृहांची माहिती द्या*
*Ø महिला व बालविकास विभागाचे आवाहन*
चंद्रपूर, दि, 24 एप्रिल : आपल्या परिसरात अनाधिकृत छात्रावास, अनाधिकृत बालगृह/ बालकांचे निवासी संस्था सुरु असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या टोल फ्री नंबरवर तसेच महिला व बाल विकास विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
परिसरात अनाधिकृत बालगृह व छात्रावास सुरु असेल तर तात्काळ टोल फ्री नंबर 1098 ला माहिती द्यावी व बाल शोषण रोखण्याकरीता सहकार्य करावे. पुणे जिल्ह्यात आळंदी आणि ठाणे जिल्ह्यात खडवली येथे विनापरवाना, अनाधिकृत बालगृह, छात्रावास आणि अनाथालय चालवण्यात येत असल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून समोर आल्या आहेत. या ठिकाणी बालकांना इच्छा नसताना ठेवले जाते व त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण झाले आहे. हे प्रकरण खुप गंभीर आहे. बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व संशोधित अधिनियम 2021 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 चे उल्लंघन आहे. या अधिनियम मधील कलम 42 नुसार अशा संस्थाना आवश्यक मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विना नोंदणी प्रमाणपत्र बालगृह/संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष कारावास आणि कमीतकमी 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते.
त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात व क्षेत्रात असे अनाधिकृत बालकांच्या संस्था/बालगृह व छात्रावासबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर 1098 वर माहिती देवून बालकांचे शोषण थांबविण्यास मदत करावी, असे आवाहन आयुक्त नयना गुंडे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत यांनी केले आहे.
*आकर्षक वाहन क्रमांकासाठी करा अर्ज*
चंद्रपूर, दि, 24 एप्रिल : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी MH-३४, CP-०००१ ते MH-३४, CP-९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल, त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात 28 एप्रिलच्या दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेले शासकीय शुल्काच्या रकमेचा भरणा करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत.
अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. तसेच सदर मालिका चालु असतांना वाहन 4.0 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नवीन मालिका 29 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात येईल. प्राप्त होणारे अर्ज 28 एप्रिलपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत स्विकारले जातील व एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास खालील पध्दतीने क्रमांक जारी करण्यात येतील.
एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत संबंधितांनी 28 एप्रिल रोजी 4 वाजता चौकशी करावी. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (DD) स्वतंत्र बंद लिफाफ्यातुन सादर करणे बंधकारक राहील. याच दिवशी सांयकाळी 4.30 वाजता वाढीव रकमेचे बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धानादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
*बेपत्ता महिलेसंदर्भात संपर्क करण्याचे आवाहन*
चंद्रपूर, दि. 24 एप्रिल : आशा श्रीमंत भाले (वय 45), रा. उदगीर, जि. लातूर ही 6 एप्रिल 2025 रोजी उद्गगीर येथुन तिची आई व गावातील लोकांसह हैद्राबाद येथे गेली व हैद्रबाद येथुन चंद्रपूर येथील महाकाली मंदिर येथे 7 एप्रिल रोजी मुक्काम होती. त्यानंतर सदर महिला महाकाली मंदिर परिसरातून बेपत्ता झाली. तिचा महाकाली मंदिर परीसर, बाबुपेठ रेल्वे स्टेशन, लालपेठ परीसरात शोध घेतला असता मिळुन आली नाही. त्यामुळे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे नोंद घेण्यात आली आहे. तरी सदर महिला मिळुन आल्यास पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे 07172-252200, नियंत्रण कक्ष 07172-251200 क्रमांकावर संपर्क करावा.
*बेपत्ता महिलेचे वर्णन :* वय 45 वर्षे, बांधा मजबुत, उंची 5.2 इंच, चेहरा गोल, केस काळे व लांब, अंगात लाल गुलाबी रंगाची साडी व पांढरा रंगाचा ब्लाउज, भाषा मराठी, हिंदी, बोलतात